पोषण माह व स्ट्रेंदनिंग कम्युनिटी ॲक्शन फॉर न्युट्रीशन प्रक्रियेंतर्गत आय.सी.डी.एस. विभाग, आरोग्य विभाग, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाऊंडेशन आणि साथी संस्थेच्या वतीने उसरान (ता. जुन्नर) या दुर्गम आदिवासी गावात रानभाज्यांच्या संवर्धनासाठी ‘हिरव्या देवाची जत्रा’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जुन्नरच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती निर्मला कुचीक यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘’कमी वजनाचे बालक जन्माला येवू द्यायचे नसेल, तर रानभाज्यांचा आहारात समावेश आपण करायला हवा. आपल्या सभोवताली मोठी निसर्ग संपन्नता लाभलेली आहे. तीचा पुरेपूर वापर आपल्या आहारात झाला पाहिजे. तसेच प्रत्येक पालकाला आपल्या बालकाची पोषण श्रेणी समजायला पाहिजे.’’
या कार्यक्रमात मोड आलेल्या कडधान्याची पौष्टिक भेळ तयार करण्यात आली. पालक व मुले सर्वांना खाऊ घालण्यात आली. विविध पोषण पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिके करण्यात आले. कार्यक्रमासाठी गावातील महिलांनी स्थानिक रानभाज्यांचे संकलन केले होते. तसेच रानभाज्यांचा समावेश असलेले विविध पदार्थ तयार करून आणले होते. या पदार्थांचे व रानभाज्यांचे प्रदर्शन या वेळी मांडण्यात आले होते. लोकांच्या सहभागाने या पदार्थांचे प्रथिने असलेले अन्न घटक, उर्जा देणारे अन्न घटक, कर्बोदके, जीवनसत्व व क्षार असे वर्गीकरण रांगोळी काढलेल्या वर्तुळात करण्यात आले. लोकांच्याही हे लक्षात आले की आपल्या पंचक्रोषित हे सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. विविध रानभाज्यांचे आरोग्यासाठीचे व आहारातील महत्व शैलेश डिखळे, विनोद शेंडे, स्वप्निल व्यवहारे यांनी यावेळी मांडले.
या कार्यक्रमाला सुपरवायझर श्रीमती कानडे, विश्वास शेळकंदे, जि.प.प्राथमिक शिक्षक श्री. मांडवे व श्रीम.मोढवे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात अंगणवाडी सेविका विमल लांगी, पुष्पा नाडेकर व सखु बोकड यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती जोशी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रकाश वाडेकर यांनी केले.
गावातील गरोदर मातेचे चांगले पोषण होण्यासाठी व सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी विविध पोषक रानभाज्या, कडधान्ये, अंडी, फळे, खेकडा अशा पोषक घटकांची पोषण ओटी भरण्यात आली. आणि आहारात स्थानिक रान भाज्यांसोबत पोषक आहाराचा समावेश करण्याचा संदेश देण्यात आला.
संपर्क- शैलेश डिखळे – ८८८८८४३७८४