मुंबई : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती च्या वतीने २० फेब्रुवारी २०२३ पासून सुरू असलेला संप मागे घेतला आहे. याबाबतचा निर्णय कृती समितीने जाहीर केला.
राज्य सरकारने भरीव मानधनवाढ द्यावी, मानधनाच्या निम्मी पेन्शन, नवीन मोबाईल, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅच्युइटी लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. या मागण्यांसाठी संप सुरू होता. २० फेब्रुवारी पासून संपाच्या निमित्ताने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रकल्प, जिल्हा, आयुक्त कार्यालय पातळीवर जबरदस्त आंदोलने केली. आज आझाद मैदानावर आपली ताकद उतरवली होती.
आज कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त यांनी बैठकीसाठी निमंत्रित केले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी १०% मानधनवाढ द्यायचा प्रस्ताव मांडला तो कृती समितीने नाकारला आणि शेवटी धमासान चर्चेअंती सेविकांना १५०० रूपये मदतनिसांना १००० रूपये मानधनवाढ देण्याचे मान्य करण्यात आले. मिनी अंगणवाडी सेविकांना सेविकांइतके मानधन देण्याचा मुद्दा आग्रहाने मांडला. तो विचाराधीन आहे. पेन्शन योजना लागू करण्याचे तत्वतः मान्य करण्यात आले. त्याचा तपशील आयुक्तांनी बैठक घेऊन चर्चा करून ठरविण्यात येणार आहे. नवीन मोबाईलसाठी ११५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अंगणवाडीचे भाडे २००० रूपये ते ८००० रूपये इतके वाढवण्याचे मान्य केले. ग्रॅच्युइटी लागू करण्याबाबत चर्चा करण्याचे मान्य केले.
शिष्टमंडळात एम.ए.पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, कृष्णा भानारकर आणि सरिता कंदले यांचा समावेश होता. शिष्टमंडळासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले बैठकीत उपस्थित होते. आंदोलनाला संबोधित करण्यासाठी अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन (सिटू) च्या अध्यक्षा उषा रानी दिल्लीहून उपस्थित होत्या.
आझाद मैदानावरील आंदोलनाला विरोधी पक्षाचे आमदार रोहित पवार, अदिती तटकरे, किरण लहामटे, सुनील शेळके, अतुल बेनके, बाळासाहेब आजबे, दौलत दरोडा, भास्कर जाधव, राजेंद् कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे, ऋतुराज पाटील, काँग्रेस राज्य अध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
शासनाशी झालेल्या या वाटाघाटीत कृती समितीने संप मागे घेण्याचे मान्य केले. उद्यापासून सर्वांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन कृती समितीने केले आहे. आझाद मैदानावरील आंदोलन देखील आज मागे घेण्यात आले.
कृती समितीने म्हटले आहे, आज जे काही मिळाले ते पुरेसे नाही. परंतु जे काही मिळाले ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लढून मिळवले आहे. त्यांनी आपली ताकद पणाला लावून शासनाकडून हा अल्प का होईना पण विजय मिळवलेला आहे. पुढील आंदोलनांमध्ये याहूनही जास्त ताकद लावली तर अजून जास्त काही मिळवून घेऊ शकतो असा कृती समितीला विश्वास आहे. त्या पूर्ण समाधानी नाहीत आणि कधीही असत नाहीत. परंतु त्यांनी हे असमाधान पुढच्या आंदोलनात उतरवले पाहिजे असे मत कृती समितीने व्यक्त केले आहे.
आता अंगणवाडी कर्मचारी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवणार आहेत. बजेटमध्ये केंद्र सरकारने मानधन वाढ द्यावी या मागणीसाठी आंदोलन केले जाणार आहे, त्याची लवकरच घोषणा केली जाईल. त्या आंदोलनात सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी उतरावे असे आवाहन कृती समितीने केले आहे.