अकोले (अहमदनगर) : मुळा पाणलोट क्षेत्रातील अंबित जलाशयात खासगी व्यक्तींनी मासेमारी सुरू केली आहे. माशांना टाकण्यात येणाऱ्या खाद्यामुळे पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, संबंधितांवर प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील गावांनी दिला आहे.
कौठवाडी येथील सरपंच भाऊराव भांगरे, उपसरपंच सुरेश भांगरे, नीलेश भांगरे, सी . बी . भांगरे , श्रावण भांगरे आदींसह ग्रामस्थांनी पाणी कशामुळे दूषित होते, याचा तपास करून अंबित जलाशयात सुरू असलेली मासेमारी थांबवण्याचे निवेदन दिले आहे.
आंबित जलाशयातून तीन वर्षांसाठी मासेमारीचा ठेका आंबित ग्रामपंचायतीने दिला आहे. हा ठेकेदार जलाशयातील माशांना खाद्य टाकत असून, त्यामुळे पाण्यावर काळा तवंग आला आहे. सध्या जलाशयातून पाणी सोडण्यात आले आहे. या दूषित पाण्याचा सात गावांना पुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलसंपदा विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.