Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदीत संकल्प पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा

आळंदीत संकल्प पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा

नगरपरिषदे तर्फे शाडू मातीच्या मूर्तीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी नगरपरिषदे तर्फे आळंदी पंचक्रोशीत यावर्षी गणेश उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून माझी वसुंधरा अभियान ४.० अभियान अंतर्गत शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते. या कार्यशाळेत नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहात भाग घेत शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

गणेशोत्सव कालावधीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्मोकोलची सजावट इत्यादी गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. जे पाण्यात न विरघळणारे व विषारी पदार्थ आहेत. या मुर्त्यांचे नद्या, तलाव, विहिरी यांमध्ये विसर्जन केल्या नंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच राहतात. यामुळे जलप्रदूषण होऊन पाण्यासह जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. यामुळे पर्यावरण पूरक मूर्तीचा वापर, पर्यावरणपूरक सजावट, निर्माल्य संकलन करून खत निर्मिती इत्यादी बाबत जनजागृती करून सणांच्या काळात होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना अंतर्गत उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. 

पर्यावरण पूरक मूर्त्यांमध्ये शाडू माती पासून बनविलेल्या मूर्तीचा समावेश असून या मातीत कोणत्याही प्रकारची विषारी द्रव्ये नसतात. तसेच या माती पासून बनविलेल्या मूर्ती पाण्यात विरघळून जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होत नाही. गणेश प्रेमी नागरिकांनी पाण्यात न विरघळणाऱ्या व जल प्रदूषण करणाऱ्या गणेश मुर्त्या विकत न घेता पर्यावरण पूरक अशा शाडूच्या मातीच्या मुर्त्या विकत घ्याव्यात किंवा घरच्या घरी बनवून पर्यावरण संवर्धनात योगदान देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

 यासाठी आळंदी नगरपरिषदे मार्फत शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १, २, ४ मधील शालेय विद्यार्थ्यांनी, शिक्षक वृंदांनी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला. या कार्यशाळेस श्रीमती नयन कळसकर, श्रीमती सोनाली खांडे यांनी उपस्थित राहून शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण यावेळी दिले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय