मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा 2019 मध्ये पहाटे शपथविधी पार पडला होता. यावरून राज्यात एकच खळबळ उडाली होती. शपथविधी नंतर काही तासांतच अजित पवार यांनी माघार घेतल्याने फडणवीस-पवारांचं हे सरकार कोसळलं. या शपथविधीचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. असे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी 2019 च्या घडामोडींबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या आशीर्वादानेच झाला होता. किंबहुना भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या दाव्यामुळे राज्यात एकदा खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. या बैठकीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचं ठरलं. त्या हिशोबाने आम्ही संपूर्ण तयारी केली. आमच्या शपथविधीच्या तीन चार दिवस आधी शरद पवार यांनी माघार घेतली. आम्ही सत्ता स्थापनेची सर्व तयारी केली होती. त्यामुळे अजित पवारसोबत आम्ही सरकार स्थापन केलं. शरद पवार यांनीच सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदारही सोबत येतील असं अजितदादांना वाटलं होतं म्हणूनच शपथविधी झाला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला
शेतकऱ्यांसाठी खूशखबर : शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ, वाचा काय आहे योजना
राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच