औरंगाबाद:-राज्य भरात पेटलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला औरंगाबाद शहरात व जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रतिसाद मिळाला. शहराव्यतिरिक्त जिल्ह्यातील पैठण आणि माळीवाडा येथे शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून रोष व्यक्त केला.
औरंगाबाद शहरात माकपचे जिल्हा सचिव व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ऍड.भगवान भोजने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दगडावर दूध ओतून अभिषेक करण्यात आला. दुधाला १०रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात यावे ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी होती त्याच बरोबर लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट भरणाऱ्या गरिबांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ सर्व गरजू गरीब कुटुंबास प्रत्येकी ७,५०० रुपये अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी जेष्ठ माकप नेते कॉ.पंडीत मुंढे,कामगार नेते कॉ.उद्धव भवलकर,माकपचे शहर सचिव कॉ.श्रीकांत फोपसे, कॉ.राजेंद्र राठोड, कॉ.प्रकाश पाटील, कॉ.राजू शिरपे,कॉ.माणिक ढवळे, कॉ.बाबासाहेब वाव्हळकर,कॉ.सचिन गंडले, कॉ.प्रमोद गोरे,SFI चे जिल्हा अध्यक्ष कॉ.लोकेश कांबळे इ.नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
पैठण शहरात ही शेतकऱ्यांनी दुधाला प्रती लिटर दहा रुपये अनुदान द्या या मुख्य मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी आंदोलन केले. किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.गणेश शिंदे हे नेतृत्व स्थानी होते.दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांची पिळवणूक बंद करा, परदेशातून दुधाची भुकटी आयात करणे बंद करा, अश्या घोषणा देत यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी किसान सभेचे जिल्हा समिती सदस्य कॉ.गणेश शिंदे, कॉ.गौतम चाबुकस्वार यांच्यासह सागर कुमावत, दिपक झरखंडे, प्रदीप पगारे,गणेश नवगिरे,निलेश सणवे,साईनाथ देशमुख इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
तर जिल्ह्यातील माळीवाडा येथील आदिवासी बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेऊन मागण्यांना पाठिंबा दिला.हातात लाल झेंडे घेऊन यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी अमेरिकेतून दूध पावडर व दुग्धजन्य पदार्थ आयात करून देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला व राज्य सरकारने दुधाला भाववाढ लागू करावी ही मागणी करण्यात आली. या वेळी किसान सभेचे जिल्हा सहसचिव कॉ.शिवनाथ कुमरे यांच्या सहित अनेक शेतकरी उपस्थित होते.