घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील चास ठाकरवस्ती कडे जाणारी पाऊलवाट जमीन मालकाने बंद केलेली होती. यामुळे येथील आदिवासी ठाकर बांधवांचे दळणवळण थांबले होते, मुलांची शाळा देखील बंद झाली होती. त्यामुळे सदरील रस्ता पूर्ववत होणेसाठी व वस्तीला कायमस्वरूपी रस्ता मिळावा, यासाठी संबंधित ठाकरवाडीतील नागरिक व विविध संघटनाचे कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन सुरू केले होते.
यावेळी ठाकरवस्ती येथील लहान मुलांपासून वयस्क व्यक्तीपर्यंत सुमारे 100 पेक्षा अधिक नागरिक भर पावसात या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल घेत प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत आंदोलनकर्ते यांचे शिष्टमंडळ आदिवासी विकास विभागाचे योगेश खंदारे, महसुल विभागाचे विविध अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस प्रशासनाचे नामदेव ढेंगळे व लोकप्रतिनिधी देविदास दरेकर, खंडू पारधी, बबन बारवे, जालिंदर काळे, पोलीस पाटील वैभव शेगर, इ.या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत ठरल्यानुसार तात्काळ महसूल विभागाचे, आदिवासी विकास विभागाचे व पोलीस प्रशासनाचे आणि चास-ठाकरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व प्रातिनिधिक आंदोलनकर्ते यांनी एकत्रित घटनास्थळी भेट दिली. यावेळी ज्या जागा मालकाने जाण्यायेण्याची पाउलवाट अडवली होती, त्या संबंधित व्यक्तीसमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर संबंधित जागा मालकाने स्वतः अडवलेला रस्ता मोकळा करून दिला.
याचवेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे डॉ.संजय दाभाडे व शेतमजूर युनियनचे डॉ.ज्ञानेश्वर मोटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदरील आदिवासी बांधवाना न्याय देण्याची मागणी केली.
यानंतर प्रशासनाच्या वतीने रात्री ९ वाजता आंदोलनकर्ते यांना लेखी पत्र देण्यात आले. सदरील वस्तीला कायमस्वरूपी रस्ता कसा उपलब्ध करून देता येईल ,याविषयी लवकरच विविध अधिकारी यांची एकत्रित बैठक आयोजित केली जाईल. व तोपर्यंत सदरील पाऊलवाट बंद होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे या पत्रात नमूद करण्यात आले. यानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे व किसान सभेचे नेते राजू घोडे, आदिवासी ठाकर समनव्य समितीचे अर्जुन काळे, अविनाश गवारी, शारदा केदारी, लालाजी पारधी, रत्नाबाई पारधी व शेतमजूर युनियन (लाल बावटा) चे सुभाष पारधी, ज्योती पारधी इ.नी केले.
या आंदोलनाला पाठिंबा देणेसाठी अनुसूचित जाती-जमातीचे नंदकुमार बोऱ्हाडे, एस.एफ.आय.संघटनेचे समीर गारे, सामाजिक कार्यकर्ते विजय आढारी, अमोल अंकुश, आदिवासी ठाकर संघर्ष समिती जुन्नरचे डॉ.विनोद केदारी यांनी प्रत्यक्ष येऊन या आंदोलनाला पाठींबा दिला.