बीड : एक शिक्षकी शाळेचा तुघलकी निर्णय रद्द करा, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एसएफआय म्हटले आहे की, नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असून पुन्हा एकदा राज्य सरकार आणि प्रशासनाने विद्यार्थी हीता विरोधी असणारा निर्णय घेतला आहे. दि. २१/०६/२३ रोजी प्रशासनाने जिल्ह्यातील १ ते १० व ११ ते २० पटसंख्या असलेल्या शाळेवरील प्राथमिक शिक्षक व प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाने १ ते १० व ११ ते २० पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेवर शिकवण्यासाठी व मुख्याध्यापक पद सांभाळण्यासाठी एकच शिक्षक उरतो.
या होणाऱ्या समायोजनाने सदरील २० पेक्षा कमी असलेल्या पटसंख्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून हा घेतलेला एक शिक्षकी शाळेचा निर्णय मागे घेण्यात यावा. अन्यथा एसएफआयच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थी व पालकांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा एसएफआयच्या वतीने प्रशासनास देण्यात आला.
यावेळी एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, बीड जिल्हा सचिव संतोष जाधव, डीवायएफआय युवक संघटनेचे बीड तालुकाध्यक्ष सुहास जायभाये, एसएफआयचे जिल्हा उपाध्यक्ष शिवा चव्हाण, जिल्हा सचिव मंडळ सदस्य युवराज चव्हाण, जिल्हा कमिटी सदस्य समीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.