Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष अत्याचारासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा- आम...

मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष अत्याचारासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा- आम आदमी पार्टीची मागणी..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीमाराचा तीव्र निषेध करत दोषी पोलिसांवर कारवाईची आम आदमी पक्षाची मागणी.

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषण करत होते. मात्र आंदोलकांना उपोषणासाठी विरोध करत पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांवर तीव्र लाठीचार केला त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला, मराठा उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात राज्यभरात आम आदमी पार्टीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं असताना आंदोलकांच्या मंडपात पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे महिला, लहान मुले मोठ्या संखेने जखमी झाले आहेत, जालन्यातील आंदोलन अमानुष पद्धतीनं मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत मराठा आरक्षण प्रकरणी सरकारनं समाजाचा अंत पाहू नये असा ईशारा आप दिला आहे. पोलिसांनी महिला, वयोवृध्द नागरिक, लहान मुलांना व उपचार करणाऱ्या डॉक्टरला सुद्धा मारहाण केली, मोठ्या प्रमाणात छऱ्यांचा वापर करण्यात आला. आम आदमी पार्टीने या घटनेचा जाहीर निषेध करत विविध मागण्या केल्या आहेत.

निर्दोष मराठा समाजावर अमानुष लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, या घटनेची सखोल चौकशी करून अत्याचार करणाऱ्या दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या अमानुष लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या मराठा बांधवांना शासनातर्फे भरपाई व आर्थिक मदत करण्यात यावी. यावेळी आपचे संतोष इंगळे म्हणाले की गृहखात्याकडून केलेली कार्यवाही ही अतिरेकी स्वरूपाची भूमिका आहे, संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाला नेहमीच भाजपा सरकारने सापत्न वागणूक दिलेली आहे.

मुळात आरक्षण संपवण्याचा विडा घेतलेले भाजप सरकार आणि मराठा आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवून त्यावर राजकारण करणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या घटनेला सर्वस्वी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया आपचे राज चाकणे यांनी दिली. आम आदमी पार्टी कधीही जातीचे राजकारण करीत नाही, परंतु भाजपा सरकारने नेहमीच जातीचे राजकारण केलेले आहे, त्यांनी महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रश्न तेवत ठेवला आहे, असे आपचे सतिश नायर यांनी सांगितले.

आम आदमी पार्टी तर्फे या अमानुष अत्याचारा विरोधात राज्यात ठीक ठिकाणी निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना याबाबत निवेदन देण्यात आले व याबाबत योग्य न्याय न मिळाल्यास राज्यभरात तीव्र निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टीचे संतोष इंगळे, सतिश नायर, अमर डोंगरे, अजय सिंग, कमलेश रणावरे, वहाब शेख, राज चाकणे आदि उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय