नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतही मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता अजित पवार गटाकडून थेट राष्ट्रवादीचा अध्यक्ष पदावर दावा करण्यात आला आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजिदादा यांच्यासोबत अन्य ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. बुधवारी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून मुंबईत मीटिंग आयोजित करण्यात आली होती. मिटींगला अजित पवार यांच्यासोबत ३३ तर शरद पवार यांच्यासोबत १६ आमदार असल्याचे समोर आले. या सर्व परिस्थितीत अजित पवार गटाकडून आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करण्यात आला आहे.
अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसं पत्र निवडणूक आयोगामध्ये (Election Commission Of India) दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे अजित पवारांकडे पक्षाचे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहिती द्यावी लागणार आहे.
आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.