नाशिक : नाशिक शहरात राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राजर्षी शाहूमहाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्याच मुळे शाहूमहाराजांचे कार्यकर्तृत्व, बहुजन समाजाचे सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक उत्थानासाठी केलेले कार्य नवीन पिढी समोर पोचवण्याच्या उद्देशाने आपण नाशिक शहरामध्ये ह्या स्मृती शताब्दी समितीचे कार्य सुरु केले आहे. ह्यात शहरातील विविध राजकीय, बिगरराजकीय संस्था, संघटना मधील कार्यकर्ते सहभागी आहेत. त्यातून पुढील वर्षभर विविध उपक्रम राबवण्याचा समितीचा मानस आहे.
शाहूमहाराज १९२० मध्ये नाशिक मध्ये आले असताना त्यांनी नाशिक मधील उदोजी मराठा बोर्डिंग, वंजारी बोर्डिंग व छत्रपती शाहूमहाराज बोर्डिंग ह्या संस्थाना भेट देऊन भरघोस मदत दिली होती. त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या ह्या संस्थामधून गेल्या शंभर वर्षात मोठ्या प्रमाणात बहुजन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. आज ह्या संस्थांचा वटवृक्ष झाला आहे. महाराष्ट्राचा इतिहास राजर्षी शाहूमहाराज यांचे नावाच्या शिवाय पूर्ण होणार नाही ! परंतु, ज्या नाशिक शहराशी महाराजांचा इतका निकटचा सबंध आला त्या शहरात शाहू महाराजांचा पुतळा नाही हि अत्यंत दुखद बाब आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, यासाठीचा आवश्यक पाठपुरावा शासन स्तरावर करून जनतेची भावना विचारात घेऊन पुढील कार्यवाही करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी स्मृती शताब्दी समिती चे अध्यक्ष राजू देसले, सचिव जयवंत खडताळे, शिवदास म्हसदे, ॲड. नाजीम काझी, ॲड. प्रकाश काळे, भीमा पाटील, प्रभाकर धात्रक आदींसह उपस्थित होते.