मुंबई(२५ मे) :- उद्धवला सांभाळा…असे उद्गार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भावनिक होऊन काढले होते आणि मुंबईसह महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभी राहिली. मुंबई पाठोपाठ अनेक महापालिकांत शिवसेनेला यश मिळाले. पुढे तर या यशाने टोक गाठले, त्याची परिणीती उद्धव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यात झाली. बाळासाहेब म्हणाले होते उद्धवला सांभाळा आज महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे महाराष्ट्राला सांभाळत आहेत.
शांत, संयमी वेळप्रसंगी राज्यासाठी खंबीर भूमिका घेणारे अशी उद्धव ठाकरेंची ओळख बनली आहे. राज्यात कोरोनाविरोधात लढा सुरू आहे. ही लढाई उद्धव निकराने लढत आहेत. गरज वाटेल तेव्हा चढाई करून नवे नियम जारी करायचे. सक्षमपणे यंत्रणा हाताळायची. हे कसब उद्धव यांनी लीलया पेललेयं. काम करत राहायचे. ते करताना मात्र प्रसिद्धीपासून दूर राहायचे, या विशेष गुणांमुळे उद्धव यांच्यावर समाजमाध्यमातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
शिवसेनेतून अनेक नेते फुटले. सोडून गेलेल्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले. शिवसेना संपवण्याचीही भाषा केली गेली. अशा कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरे शांत, संयमाने उभे राहीले. त्यांच्यावरील आरोपांना जास्त उत्तरे देण्याच्या भानगडीत न पडता शिवसेना वाढविण्याच्या प्रयत्नांत ते राहीले. संकट राजकीय असो वा कोणतेही त्यातून बाहेर पडणे उद्धव यांच्यासाठी नवीन नाही. म्हणूनच विरोधी पक्ष भाजपवाले दररोज नवीन आरोप करूनही उद्धव यांच्या सरकारचे काहीही करू शकलेले नाही.
वेळप्रसंगी राजकारणात एक पाऊल मागे येऊन सत्तेत बसावे. पण सत्तेत असताना भूमिका न पटल्यास सत्ताधार्याना सळो की पळो करून सोडावे, ही भूमिका शिवसेनेलाच जमली. पुढे मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणी होऊनही मित्राने तशी बोलणी झालीच नाही, असे सांगितल्यानंतर उद्धव यांची कणखर भूमिका देशाने पाहिली. पुढे झालेल्या घडामोडी आणि उद्धव यांच्या गळ्यात पडलेली मुख्यमंत्रीपदाची माळ हा इतिहास सर्वश्रूत आहे. त्यावेळीही उद्धव यांच्यावर विरोधकांकडून टीका झाली. त्यांना प्रशासनाचा, सभागृहाचा अनुभव नाही. उद्धव यांनी विरोधकांच्या टीकेला बोलण्यातून नव्हे तर कृतीतून उत्तर दिले. सभागृहातील त्यांचे पहिलेच भाषण जणू काही त्यांना वर्षानुवर्षे विधानभवनाचा अनुभव आहे, असा होता. या भाषणानेच उद्धव महाराष्ट्राचा कारभार कसा हाकणार, हे पुढे त्यांनीच सक्षमपणे सिद्ध केले. तीन पक्षांचे सरकार टिकणार नाही. या आशेवर विरोधक होते. तर दुसरीकडे उद्धव यांनी त्यांचे नेतृत्व मजबूत करण्यावर भर दिला.
मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर येथे आहे. हे शहर चालविण्याचा वर्षांनुवर्षाचा अनुभव शिवसेनेच्या पाठीशी आहे.म्हणूनच दाटीवाटीच्या मुंबईत प्रचंड वेगाने कोरोना पसरला नाही. तो पसरला असता तर हाहाकार उडाला असता. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन, राज्य सरकार यांच्या प्रयत्नाने दाटीवाटीच्या तुलनेत कोरोना बाधितांची संख्या कमीच राहिली.
ज्यांना खर्या अर्थाने मुंबईच्या दाटीवाटीचा अनुभव आहे, अशी व्यक्ति मुंबईच्या कोरोना रुग्णांचा वाढणारा वेग पाहील्यास उद्धव यांच्यावर टीका करण्याची घाई करणार नाही. अर्थात तरीही काही ज्येष्ठ पत्रकारांत उद्धव यांच्यावर टीका करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर एकटे राज्य सरकारच कमी पडले, हे कोणालाही मान्य होणार नाही. केंद्र सरकार आणि कामगार संघटना यांचे अपयश आणि संघटित होण्याची ताकद न समजलेले मजूरही याला कारणीभूत आहेत.
महाराष्ट्र राज्य सक्षमपणे कोरोनाशी लढत आहे. पोलिस, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, समाजसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते कठीण काळात राज्याच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत. प्रशासनात असणार्या त्रुटी दूर करून सुधारणा केल्या जात आहेत. या महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थेत, समाज व्यवस्थेत काही त्रुटी असतील तर त्या राज्य सरकारच्या निदर्शसनास आणून देणे, हे आपले कर्तव्य आहे. तरच महामारीमुक्त महाराष्ट्र आपण घडवू शकू.
– प्रशांत गायकवाड