Thursday, November 21, 2024
Homeविशेष लेखरोमन याकोबसन आणि भाषांतर अभ्यास - डॉ. दीपक बोरगावे

रोमन याकोबसन आणि भाषांतर अभ्यास – डॉ. दीपक बोरगावे

       [पाश्चात्य जगतात भाषांतर अभ्यासाची सुरुवात ही तशी विसाव्या शतकातील. पण भाषांतर हे एक अभ्यासक्षेत्र म्हणून विकसित झाले ते १९५० नंतरच आणि यामध्ये रोमन याकोबसन (Roman Jacobson, १८९६-१९८२; १९६०) यांचे नाव अग्रस्थानावर घेतले जाते, ते त्यांच्या “भाषांतराचे भाषावैज्ञानिक पैलू” (On Linguistic Aspects of Translation) या निबंधामुळे. हा निबंध मिलिंद मालशे यांनी मराठीत अनुवादित केला आहे (संपा. कल्याण काळे, भाषांतरमीमांसा, प्रतिमा प्रकाशन १९७७). भाषांतर या विषयात ज्यांना रस आहे त्यांनी हा अवश्य वाचला पाहिजे.]

           तसे पाहता, रोमन याकोबसन  हे संरचनात्मक भाषाशास्त्राचे (structural linguistics) जनक म्हणून ओळखले जातात. या क्षेत्रात त्यांनी केलेले काम हे विसाव्या शतकातील अनेक अभ्यास क्षेत्रावर प्रभाव टाकणारे ठरले. वाक्यरचनेचा अभ्यास (syntax, याला व्याकरणशास्त्र असेही म्हटले जाते), शब्द कसे बनतात, त्याचे शास्त्र (morphology), शब्दार्थ, त्याचे तत्वज्ञान व विकास याचे शास्त्र (semantics), भाषेत संप्रेक्षण कसे होते? एखादा शब्द उच्चारल्यानंतर ऐकणार्‍याला त्याचे अर्थांतरण आणि अर्थबोधन कसे होत? अशा अनेक भाषेतील जटिल प्रश्नांची उत्तरे शोधण्यात याकोबसन यांनी आपल्या संशोधनातून प्रयत्न केले. भाषेच्या या अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाच्या अंगांचा त्यांनी अभ्यास केला आणि या क्षेत्रात मूलभूत अशा प्रकारचे योगदान दिले. याचबरोबर त्यांचे ध्वनीशास्त्रातले (phonology) कामही खूप महत्त्वाचे ठरले. त्या काळात  चित्रपटातील ध्वनी विकास हा या संशोधनामुळे साहाय्यक ठरला. १९५१ साली त्यांचे भाषेच्या ध्वनीशास्त्रवरचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. आज आपण ‘ध्वनीशास्त्र’ (Phonetics) या विषयाचा भाषाशास्त्रात सहज शिरकाव झालेला पाहतो. पण मुळात हे शास्त्र याकोबसन यांनी विकसित केले, याबद्दल फारशी कल्पना कोणाला नसते. याकोबसन यांचा या भाषा अभ्यासाला Synchronic Linguistics असे म्हटले जाते. भाषेचा इतिहास लक्षात न घेता समकालीन किंवा तत्कालीन भाषा वापराचा या अभ्यासत भर दिला जातो. याउलट, भाषेचा इतिहास लक्षात घेऊन केलेल्या अभ्यासाला Diachronic Linguistics असे म्हटले जाते. स्लाविक भाषाशास्त्राचाही त्यांनी पाया घातला.

         याकोबसन हे मुळचे रशियाचे. एका ज्यू कुटुंबात १८९६ मध्ये त्यांचा जन्म झाला. माॅस्को विद्यापीठात भाषाशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असताना, फर्डिनंड द सोस्युअर (स्विस भाषातज्ज्ञ; १८५७-१९१३) यांच्या भाषाविषयक विचाराने ते प्रेरित झाले आणि त्यांची भाषाविषयक दृष्टी संपूर्णतः बदलून गेली. रशियामधील बोल्शेविक क्रांतीचे ते समर्थक असून देखील, रशियन क्रांतीच्या काळात १९२० मध्ये त्यांनी आपली मायभूमी सोडली. प्रथम प्राग (१९२६, Prague), नंतर झेकोस्लाव्हाकिया आणि मग १९६७ मध्ये अमेरिकेतील हावर्ड युनिव्हर्सिटी येथे भाषाशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत काम केले. 

          क्लवड् लेवी स्ट्रावस (Claude Lévi-Strauss १९०९-२००९), लिओनार्ड ब्लूमफिल्ड (Leonard Bloomfield) आणि रोलॅण्ड बार्थस हे यांच्या सानिध्यात काही काळ होते. याचाच एक परिणाम म्हणजे स्ट्रावस यांनी संरचनात्मक सिद्धांताचा पाया घातला आणि संरचनावाद सिद्धांताचे एक उद्गाते म्हणून त्यांचे नाव पाश्चात्य जगात अधोरेखित झाले. स्ट्रावस आणि याकोबसन यांनी मिळून एका ग्रंथाची निर्मितीही केली आहे. याशिवाय सी. गुन्नर फॅण्ट आणि  मॉरीस हॉल यांच्याबरोबरच आजचे जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ, तत्कालीन तरुण नोम चॉमस्की हे देखील त्यांच्या भाषाशास्त्र अभ्यासाच्या प्रभावाखाली होते. भाषेचा विचार कसा करावा किंवा केला पाहिजे हा धडा चॉमस्की यांनी याकोबसन यांच्याकडूनच शिकून घेतला. 

           “भाषांतराचे भाषावैज्ञानिक पैलू” (On Linguistic Aspects of Translation) या निबंधात भाषांतराबद्दल याकोबसन यांनी आपले विचार मांडले आहेत. भाषांतराच्या समस्यांबद्दल आणि भाषांतर प्रक्रियांच्या स्वरूपाबद्दल त्यांचे हे विचार आजही मूलभूत मानले जातात. थेट प्लेटो आणि अरिस्टॉटल पासून रसेल विटगीनस्टाईन (१८८९-१९५१) पर्यंत भाषेचा जो पारंपरिक विचार होता, तो त्यांनी नाकारला. पारंपरिकदृष्ट्या भाषा ही एक वास्तवाचे प्रतिबिंब म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. भाषेमुळे आपण आपल्या भावना, विचार, माहिती आदी व्यक्त करतो. भाषा ही सामाजिक संप्रेषणाचे माध्यम आहे, हा विचार भाषेच्या पारंपरिक तत्वज्ञानातून आलेला आहे.  याकोबसन यांनी भाषेबद्दल वेगळा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांनी म्हटले आहे की, भाषा ही वास्तवाची प्रतिकृती नसून, ती एक चिन्हव्यवस्था आहे.

             म्हणजेच भाषेतील शब्द, ध्वनी, त्यांचे अर्थ हे संस्कृती सापेक्ष (culture specific) असतात; ते संस्कृती सांकेतिकही (culture convention) असतात. शब्दांच्या या ध्वनीरूपाला चिन्ह विचारात चिन्हक (signifier) म्हणतात, तर ज्या शब्दाने वास्तवातील वस्तूचा निर्देश होतो त्याला चिन्हीत (signified) म्हणतात. 

             आता चिन्ह व्यवस्था म्हणजे काय? हे आपणांस समजून घेतले पाहिजे, त्याशिवाय याकोबसन यांचा भाषांतर विचार समजणे कठीण आहे. उदाहरणार्थ, माझी मातृभाषा जर मराठी आहे, तर मग मराठीतील कोणताही शब्द (किंवा वाक्य) उच्चारल्यावर मला त्याचा ‘अर्थ’ समजतो, याचे मुख्य कारण म्हणजे मराठी भाषा मला येत (प्राप्त) असते. उदाहरणार्थ, ‘पाणी’ हा शब्द उच्चारल्यावर, /प/ /आ/ आणि /ण/ /ई/ म्हणजे दोन व्यंजने आणि दोन स्वरांचे ध्वनिरुप आपणास ऐकू येते आणि आपणास या शब्दाचा अर्थ कळतो. जर हाच शब्द कन्नड किंवा तामिळ या आपणाला न येणाऱ्या भाषेत उच्चारला गेला तर आपणाला त्याचा अर्थ अजिबात समजत नाही. आपणास प्राप्त असणाऱ्या भाषेतील  व्याकरणाचा आपला जाणीवपूर्वक अभ्यास जरी नसला, तरीही व्याकरणीयदृष्ट्या चुकीचे म्हटलेले वाक्य आपणास लगेच लक्षात येते. म्हणजे थोडक्यात असे म्हणता येईल की, आपणास प्राप्त असलेल्या भाषेत ध्वनी उच्चारणानंतर ज्या वस्तूचा (किंवा विचार, भावना यांचा सुद्धा) निर्देश होतो ती वस्तू आपणास समजते / लक्षात येते.

               प्रत्येक भाषेत ध्वनी, चिन्ह आणि अर्थ यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक कडेकोट बंदोबस्त इतका जबरदस्त आणि कडक असेल तर मग त्याचे स्थानांतरण (भाषांतर) दुसऱ्या भाषेत  कसे होणार? हा कळीचा प्रश्न याकोबसन यांनी भाषांतराच्या संदर्भात उपस्थित केला आहे. मग पुढे उपस्थित होणारे प्रश्न, भाषांतर कसे करावे? त्याच्या पद्धती काय असाव्यात? भाषांतरात संस्कृती अभिसरणाचे काय करायचे? भाषांतरात समतुल्यत्व (equivalence) साधले गेले आहे का? लक्ष्य भाषेतील वाचकाला भाषांतरित मजकूर समजतो आहे का? वगैरे प्रश्न मग निर्माणच होऊ शकणार नाहीत किंवा आपणास ते उपस्थित करताही येणार नाहीत. 


              निर्देश केलेली वस्तू व्यक्तीच्या अनुभवविश्वात जर उपस्थितच नसेल, तर त्या शब्दाच्या उच्चारणाने त्या वस्तूच्या अर्थाचे आकलन होणे संभव नाही. अपरिचित सास्कृतिक जीवनातील वस्तूंचे/विचारांचे/ संकल्पनांचे आकलन होणे अशक्य असते. म्हणून कोणत्याही […क्ष…] शब्दाचा किंवा शब्दसमुहाचा (phrase) अर्थ ही निःसंशयपणे एक चिन्हीत तथ्य असते. उदाहरणार्थ, ‘भाकरी’ या शब्दाचे अर्थांतरण इंग्रजी किंवा युरोपियन संस्कृतीमध्ये होणे संभव नाही, कारण ‘भाकरी’ ही वस्तू पाहिलेली /अनुभवलेली /स्पर्शलेली /खाल्लेली नसते. ती त्या संस्कृतीत उपस्थितच नसते. चिन्हीत (signified)  म्हणजे निर्देश केलेली वस्तू तेव्हाच अस्तित्वत असते जेव्हा चिन्हक (signifier) अस्तित्वात असते. माहित नसलेल्या किंवा अपरिचित असलेल्या वस्तूंचा/ विचारांचा/ संकल्पनेचा अर्थ समजण्यासाठी भाषिक चिन्हांची एक मालिकाच आवश्यक असते आणि इथेच भाषांतर प्रक्रियेला सुरुवात होते. आंतरसांस्कृतिक संप्रेक्षणासाठी (intercultural communication) याची गरज असते.

             थोडक्यात, असे म्हणता येईल की, शब्दाला समतुल्य प्रतिशब्द जोडून भाषांतर करता येत नाही. भाषांतर म्हणजे केवळ एका कोड (language) मधून दुसऱ्या कोडमध्ये अर्थांतरीत /अभिसरीत/ स्थानांतरित केलेली संहिता नसते. ती लक्ष्य संहितेतील संस्कृती संकेतांना निर्देश करणारी एक नवीच संहिता असते (Rewording). म्हणून भाषांतर प्रक्रिया ही केवळ भाषिक कृती नसून ती एक मूलतः सांस्कृतिक कृती बनते. भाषांतर करत असताना किंवा भाषांतरित संहितेच्या संदर्भात म्हणूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ, शब्दांची व वाक्यरचनेची निवड करताना ती लक्ष्य भाषेत (target language) कितपत स्वीकारार्ह आहे? लक्ष्य भाषेच्या संस्कृतीच्या अंगाने ती समतुल्यत्व साधू शकते का? लक्ष्य भाषेच्या वाचकापर्यंत ती स्त्रोत भाषेच्या (source language) संहितेबरहुकूम पोचते का? अर्थाच्या दृष्टीने ती स्त्रोत संहितेला अपभ्रंशित (distort) तर करत नाही? संस्कृतीच्या दृष्टीने एखादा शब्द किंवा शब्दप्रयोग हा भाषांतरातीत /अ-भाषांतणरीय  (untranslatable) आहे का? मग अशा वेळी भाषांतरकाराची काय भूमिका असते/असावी? असे अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

               अशा भाषिक परिस्थितीत, सर्जक चिन्हांतरणचा (transposition; translation नव्हे) प्रयोग करायला हवा, असा याकोबसन यांचा आग्रह आहे. सर्जक चिन्हांतरण समजून घेण्यासाठी एक दोन उदाहरणे घेऊ या. हंसा वाडकर यांचे प्रसिद्ध आत्मकथन, ‘सांगते ऐका’ या शीर्षकाचे शोभा शिंदे आणि जसबीर कौर यांनी, ‘You Ask, I Tell’ (Zubaan, २०१२) असे odd translation केले आहे. इथे जर त्यांनी सर्जक चिंन्हांतरण केले असते तर, Story of My Life; My Story; Let me Tell you…; Listen to Me वगैरे असे काहीतरी झाले असते. बेबी कांबळे यांच्या ‘जिणं अमुचं’ या आत्मकथनाच्या शीर्षकाचे माया पंडित यांनी मात्र, ‘The Prisons we Broke’ (BlackSawn, २००९) असे समर्पक सर्जक चिंन्हांतरण केले आहे. 

           काव्याच्या भाषांतराबद्दल याकोबसन यांची निरीक्षणे महत्त्वाची आहेत.  काव्य हे स्वभावत: भाषांतरातीत किंवा अ-भाषांतरणीय आहे (Poetry by definition is untranslatable), असे त्यांनी म्हटले आहे. काव्याचे भाषांतर ही संभवनीय बाब नाही. कवितेतील वाचिक चिन्हव्यवस्था (constituents of the verbal code) ही सरळसोट नसते. त्यात विरोधाभास, साधर्म्य या व अशा अनेक घटकांचा समावेश असतो. कवितेमध्ये स्वायत्त चिन्हांचे (own autonomous signification) जग असते आणि त्यांचे चिन्हांतर्गत काव्य विश्वात त्याचे वेगळे महत्व असते.  उदाहरणार्थ, काव्यात श्लेषोक्ती ही काव्य कलेवर (poetic art) अधिराज्य गाजवत असते. काव्य हे स्वभावत: भाषांतरातीत (untranslatable) असल्यामुळे याबाबतीत फक्त ‘सर्जक चिन्हांतरणच’ (transposition) शक्य आहे. काही भाषांतरातीत परिस्थितीत (untranslatable situations)  ‘सर्जक भाषांतर’ केले पाहिजे, असे याकोषसन यांनी म्हटले आहे.

              विस्तार भयामुळे सर्जक भाषांतराचे  कवितेतील एकच उदाहरण देतो. अरुण कोलटकर यांच्या चिरीमिरीतील (प्रास,२००४: ३३) ‘जोहार’ ही कविता कोलटकर यांनी स्वत:च इंग्रजीत भाषांतरित (Prass Publication, Boatride and Other poems, २००९: १११ ) केली आहे.

Source Text:

जोहार मायबाप जोहार

तुमच्या महाराचा मी महार

हे चातुर्वर्ण्याचे हे गाढव

रस्त्यावर एका वाचिक चिन्हांचे  भाषांतर ( (Intersemiotic Translation) : पडलं आडवं

Target Text:

greetings my masters

from the slave of your slave

the lowest of the low requests

permission to speak 

i got news for you sir

The donkey sir

The donkey of the caste system is dead

it just collapse and die

and now it is blocking the road

             या वरील भाषांतरामध्ये ‘तुमच्या महाराचा मी महार’ या एका ओळीसाठी, ‘the slave of your / slave / the lowest of the low requests

permission to speak या दोन ओळी, ज्या मूळ संहितेत नाहीत, त्या कवितेचा आशय ठळक करण्यासाठी वापरल्या आहेत. पुढे, ‘हे चातुर्वर्ण्याचे हे गाढव’ या एकाच ओळीसाठी The donkey sir / The donkey of the caste system is dead / it just collapse and die या चार ओळींचा प्रयोग केला आहे. हे सर्जक भाषांतराचे उत्तम उदाहरण म्हणायला हरकत नसावी.

डॉ. दिपक बोरगावेपुणे

लेखक, पुणेस्थित असून 

भाषांतर या विषयात पी.एच.डी. अनेक पुस्तकांचे मराठीत अनुवाद. अलिकडेच भवताल आणि भयताल हा कवितासह प्रकाशित असून गुजरात फाईल्स या राणा अय्यूब यांंच्या पुस्तकाचे मराठी अनुवाद केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय