कोरोनामुळे जगात व देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यातून आता समाजवादी अर्थव्यवस्थेशिवाय मार्ग नाही, हे हळूहळू लोकांच्या लक्षात येत आहे. हे वातावरण तयार झाले आहे. पण नेहमीप्रमाणे कम्युनिस्ट मंडळी ही संधी वाया घालवतील अशीच परिस्थिती दिसते आहे. आपल्या सिध्दांतातील काना-मात्रा इकडे-तिकडे होवू नये यासाठी ज्यांनी जनतेचे पुढारपण करण्याच्या आलेल्या संधी वाया घालवल्या ते यावेळी काही करतील अशी अपेक्षा करावी काय? पण त्याशिवाय पर्याय नाही. खरे तर सगळे कम्युनिस्ट एकत्र येवूनही काम भागणार नाही. सगळे समाजवादी, आंबेडकरवादी, पुरोगामी एकत्र आल्याशिवाय आता पर्याय नाही. पण इतरांनी एकत्र आल्याशिवाय कम्युनिस्टांनी एक पक्ष भले आतमध्ये तपशिलातल्या मांडण्या कितीही असो, एक झालेच पाहिजे. एक मोठा संदेश देशातल्या संभ्रमित जनतेला देण्याची गरज आहे. या काळात तो दिला गेला नाही तर तो करंटेपणा ठरेल.
मतभेद काय आहेत? रशिया, चीन हे आप आपल्या मार्गाने निघाले आहेत. पण उर्वरित छोटया समाजवादी देशांनी या परिस्थित जो आत्मविश्वास दिला आहे, तो अभूतपूर्व आहे. असा आत्मविश्वास एकजूट झाल्याखेरीज निर्माण होणार नाही.
मला एकजूट होण्यात तत्वज्ञानात्मक बाबींपेक्षा नेत्यांचा वयैक्तिक हेकेखोर पणा जास्त दिसत आहे. त्यामुळे कार्यक्रमावर आधारित एकजूट किवां स्थानिक पातळीवरील एकजूट असे कार्यक्रम कार्यकर्त्याच्या माथी मारले जात आहेत. पण सर्व कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांनीच आता आपापल्या पक्षांतील नेत्यांवर दबाव आणून एक कम्युनिस्ट पक्ष करण्याची चळवळ उभी केली पाहिजे, स्थानिक पातळीवर एकत्र येऊन लढले पाहिजे, अन्यथा या भयानक परिस्थितीत कम्युनिस्टांची राजकीय शक्ती अजून कमकुवत होईल ही भीती वाटत आहे.
भांडवलशाहीने नफ्यासाठी निर्माण केलेली अत्युच्च स्पर्धा व मूठभरांच्या स्वार्थासाठी निर्माण केलेया व्यवस्थेतून निर्माण झालेले प्रश्न यांमुळे जग विनाशाच्या टोकावर उभे आहे. याचे उत्तर फक्त आणि फक्त समाजवादी व्यवस्थेत आहे, ही पोपटपंची करुन लोक कम्युनिस्टांकडे येणार नाही तर कम्युनिस्ट व्यवहार केल्याशिवाय ते येणार नाहीत, हे सर्व जण बोलतात पण एकत्र येत नाहीत.
अण्णा भाऊ साठे यांचे जयंती वर्ष आहे. कम्युनिस्ट पक्षांच्या फाटाफुटींनंतर अण्णा भाऊसारखे अनेक नेते, कार्यकर्ते सैरभैर झाले. कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम घेतात पण खरे दुखणे कुठे दूर करतात?
मतभेदांसहीत एकत्र एका पक्षात राहण्यात अडचण नाही. त्यासाठी वयैक्तिक महत्वकांक्षा सोडून सामुदायिक महत्वकांक्षेतून म्हणजेच मार्क्स यांच्या भाषेत संघर्षातून आनंद निर्माण करण्याची क्षमता प्राप्त केली पाहिजे.
अनेक कार्यकर्ते दु:खी आहेत. पण बोलत नाहीत. नेते मंडळींना हे समजून घ्यायला वेळ नाही. त्यामुळे सर्व कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांनी एकच कम्युनिस्ट पक्षासाठी आंदोलन उभे करावे. जगाचा इतिहास आहे हिटलरचा पराभव करण्यासाठी डावे लोकशाहीवादी, समाजवादी यांना एकत्र यावे लागले होते. आज देशातील वाढता फॅसिजमचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी श्रमिकांचे प्रश्न तीव्र होत असलेल्या काळात या विरोधात व्यापक एकजूटीची आवश्यकता आहे.
भारतालाच नव्हे जगाला धर्मनिरपेक्ष समतावादी राज्य निर्माणच्या संदेश देणाऱ्या राजे छत्रपती शिवराय, कार्ल मार्क्स, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिजोती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व्यापक कृती कार्यक्रम घेऊन शेतकरी कष्टकरी, श्रमिकांचे प्रश्न, सोडवण्यासाठी धर्मनिरपेक्ष, व्यवस्था निर्माण करण्यासाठी एकत्र येऊया!
कॉम्रेड राजू देसले, नाशिक
कॉम्रेड महादेव खुडे, नाशिक