पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : शहरातील पवना नदीचे प्रदूषण सतत वाढत आहे, मागील आठ वर्षांपासून मैलामिश्रित सांडपाणी व कम्पण्यातून प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे रसायनयुक्त पाणी यामुळे दरवर्षी केजुबाई बंधाऱ्या जवळ फेसाळलेले दुर्गंधीयुक्त पाणी प्रवाहातून वहात आहे. आजही पुन्हा नदी रसायनयुक्त पाण्याने फेसळलेली आहे.यावर दरवर्षी माध्यमामध्ये बातम्या येतात, परंतु पवना शुद्धिकरण प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात मनपाच्या पर्यावरण विभागाला अपयश आलेले आहे.याबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे वारंवार मागणी करूनही नदी प्रदूषण रोखण्यात यश आलेले नाही, असे सचिन काळभोर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पवना नदी परिसरातील किवळे, पुनावळे, ताथवडे, थेरगाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपरी, चिंचवड, दापोडी या उपनगरातून एकूण 24 किमी परिसरात सीमांकान करून घरगुती सांडपाणी व औद्योगिक रासायनिक दूषित पाणी शुद्धीकरण करण्यासाठी ‘ईटीपी’ प्लांट कार्यान्वित केले असते,तर पवना प्रदूषण निश्चित कमी झाले असते,असे चिंचवड येथील पर्यावरण संरक्षण सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी सांगितले.
पवना व इंद्रायणी शुद्धीकरण प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट कार्यक्षम व पुरेसे नसल्याने जलप्रदूषण वाढत आहे, दिल्लीच्या यमुना नदीसारखी पवनेची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे जन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, येथील जळजीव सृष्टीचक्र पण नष्ट झालेले आहे, तसेच नदी काठच्या बाजूने अतिक्रमणे आहेत, 1970 ची पाटबंधारे खात्याची पुर रेषा ग्राह्य धरून पवना व इंद्रायणी शुद्धीकरण प्रकल्प मनपाच्या ताब्यातून काढून घ्यावा, राज्यसरकारने एमआयडीसी, जलसंपदा, पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमून पवना शुद्धीकरण प्रकल्पाचे नियंत्रण स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.