Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडRed Zone : ‘रेड झोन’ हद्द निश्चितीसाठी महिनाभरात मोजणीची कार्यवाही 

Red Zone : ‘रेड झोन’ हद्द निश्चितीसाठी महिनाभरात मोजणीची कार्यवाही 

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत बैठक

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : संरक्षण विभागाच्या देहू ॲम्युनेशन डेपो व दिघी मॅगझिन डेपो या भागातील ‘रेड झोन’ चे मार्किंग झालेले नाही. त्यामुळे रेड झोनची मोजणी करुन नकाशा प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. Counting proceedings to determine Red Zone limits within a month

पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘रेड झोन’ बाबत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सूर्यकांत मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, नगर रचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, तहसीलदार अर्चना कदम, ‘पीएमआरडीए’ नगर रचना विभागाचे दशरथ पवार, पिंपरी-चिंचवड नगर भूमापन अधिकारी अमित ननावरे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

संरक्षण विभागाने दिघी आणि देहू मॅगझिन डेपोच्या आवारातील ‘रेड झोन’ची हद्द निश्चित करावी. त्यासाठी सर्व्हेक्षण व मोजणी करुन नकाशा प्रसिद्ध करावा. अशी मागणी यावेळी आमदार लांडगे यांनी केली. 

तसेच, निगडी, यमुनानगर, कृष्णानगर, ट्रान्सपोर्टनगर, सेक्टर २०,२१,२२,२३ व २४ परिसरातील ‘रेड झोन’ची हद्द निश्चितीबाबत अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. या भागातील सुमारे ७ हजार कुटुंबांना बांधकाम परवानगी, महसुली कागदपत्रे, वारस नोंदी याबाबत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत जिल्हा प्रशासन, संरक्षण विभाग आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली. याला जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेने नगर रचना विभागामार्फत ‘रेड झोन’ मोजणीबाबत प्रस्ताव नव्याने सादर करावा. महिनाभराच्या कालावधीत भूमी अभिलेख विभागाने जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने हद्द निश्चित करावी यासाठी भूमि अभिलेख आणि संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. 

सकारात्मक भूमिकेतून पाठपुरावा सुरू – महेश लांडगे 

जिल्हा प्रशासनाने आगामी १ महिन्यात महापालिका प्रशासनाने रेड झोन हद्द निश्चितीबाबत प्रस्ताव तयार करावा. त्याद्वारे हद्दीची मोजणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास स्थानिक मिळकतधारकांना दिलासा मिळेल आणि महापालिका उत्पन्नातही वाढ होईल. त्यामुळे आम्ही सकारात्मक भूमिकेतून पाठपुरावा करीत आहोत, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.

संबंधित लेख

लोकप्रिय