Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAshadhiwari 2024 : पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह; इतिहास आषाढी वारीचा

Ashadhiwari 2024 : पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह; इतिहास आषाढी वारीचा

पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त होता. प्रचलित आख्यायिकांनुसार पुंडलिक पंढरपुरात स्वतःच्या आईवडिलांची सेवा करीत असताना अचानक तेथे विठ्ठल (पांडुरंग) आला. त्याच्यासाठी पुंडलिकाने पुढे केलेल्या विटेवर तो कंबरेवर हात ठेवून उभा राहिला. पंढरपूरच्या देवळात मूर्तिरूपाने विठ्ठल अजूनही तसाच अठ्ठावीस युगे उभा आहे, असे मानले जाते. बहुतांश इतिहासकारांच्या मते पुंडलिक हे महाभारतकालीन संत असावेत. उत्तर सातवाहनकालामध्ये सातवाहन राज्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो मग पुंडलिक महाराज हे त्याही वेळेस एक प्राचीन ऐतिहासिक संत असावेत, असे मानले जाते. (Ashadhiwari 2024)

तेराव्या शतकात वारीची सुरवात झाली असा उल्लेख आढळतो. संत ज्ञानेश्वर याचे वडील पंढरपुरात वारीला जायचे. वारी ही महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजुरांची जुनी परंपरा इ.स. 100 ते इ.स.1300 या काळातील आहे. पावसाळ्या पूर्वी शेतांची बीज पेरणी करून मृग नक्षत्राच्या आगमनाच्या पहिल्या आठवड्यात गावोगावीचे शेतकरी टाळ, मृदुनग, चिपळ्या घेऊन विठ्ठलाचे अभंग भजने गात पंढरीच्या दिशेने पदयात्रा सुरू करायचे. ब्रिटिश पूर्व मुघल, मराठे ,पेशवे, आदिलशाही, कुतुबशाहीच्या राजवटीत या वारीचे आगत स्वागत व्हायचे. आजही आपली सरकारे या वारीचे प्रशासकीय व्यवस्थापन नीटनेटके करत आहेत. (Ashadhiwari 2024)


आषाढी वारी आणि कालगणना

ब्रिटिशपूर्व भारतात तेलगू, कन्नड, मराठी भाषिक आताच्या कर्नाटक, आंध्र, तेलंगण व संपूर्ण महाराष्ट्रात कृषी संस्कृती व त्यावर आधारित अर्थव्यवस्था व परगणे होते. मूलनिवासी एतद्देशीय समाजात विठोबा हा सर्वांचा मोठा देव!विठोबा, बिरोबा, म्हसोबा, ज्योतिबा ही कुलदैवते शेतकरी घराण्यात कुळ पुरुष म्हणून पुजली जातात. आज उत्सवप्रिय समाजात पांढरपेशा वर्गाची दैवते वेगळी आहेत.

मात्र वारीला किती दिंड्या येतात. दिंड्यांची एकूण शिस्त, विविध संतांच्या पंढरपूरला निघालेल्या पालख्या हा याचा इतिहास तीन दशका आधीपासून आहे, ज्ञानदेव, नामदेव आधी 220 वर्षे आधी भक्त पुंडलिक काळ, 12 व्या शतकापासून ज्ञानदेव, संत नामदेव काळ, तुकोबा-निळोबा काळ आणि तुकाराम महाराज निर्वाण 19 मार्च 1650 नंतर ब्रिटिश राजवटीपासून 370 वर्षे ही परंपरा सुरू आहे. कोरोना काळात परंपरा खंडित झाली होती. मात्र या वारीचे आजही माध्यमक्रांतीच्या डिजिटल युगात सर्वांना आकर्षण आहे. जगभरातील लोक वारीमध्ये चालतात. बीबीसी, डिस्कव्हरी चॅनल आता तर फेसबुक, इंस्टाग्रामच्या युगात सोशल मीडियावर वारीचे दर्शन जगभर होत आहे.

विठूनामाचा, भक्तीचा महिमा अगाध आहे
.

आभाळाकडे नजर लावून वारकरी शेतात बीज अंकुर फुटेपर्यंत आषाढी एकादशीला पंढरपूरला वेळेवर पोचतात, कितीही निसर्ग कोपला तरी वारीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात व देशात पर्जन्यवृष्टी होते. हे सर्व विठुरायाच्या कृपेने होते, असा वारकऱ्यांचा विश्वास आहे.

सनातन काळातील वेदाभेदाना अमान्य करणारा वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा भक्तीसंप्रदाय नाही तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेली ही एक सांस्कृतिक चळवळ आहे. अठरापगड गावगड्यातील बलुतेदार, बलुतेदार जाती जमाती व मुस्लिम धर्मातील संत या वारीतून जन्मले. शेवटचा नाथ निवृत्तीनाथ नंतर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांनी बहुजन सांस्कृतिक भक्ती रसातून भेदाभेद अमंगळ ठरवले. समाजातील अन्याय व्यवस्था, सतत पडणारे दुष्काळ, अन्न पाण्याची आबाळ असलेल्या गुलामगिरीच्या कालखंडात सामान्य गरीब बाया बापड्यांना वारीतून आत्मविश्वास व चैतन्य शक्ती प्राप्त करून दिली. (Ashadhiwari 2024)

वारकरी, माळकरी हा मानाचा सन्मान तुळशीमाळ घेऊन दिला जातो. तुळशीमाळ ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत किंवा तुकाराम गाथा यापैकी कोणत्याही एका ग्रंथावर ठेवली जाते. आणि मग तीच माळ त्या वारकरी होण्याची इच्छा धरणार्‍याच्या गळ्यात घातली जाते. म्हणून त्यांना ‘माळकरी’ असेही म्हणतात. ही तुळशीमाला तुळस या वनस्पतीच्या वाळलेल्या लाकडापासून मणी बनवून केलेली असते. त्यात सामान्य: 27, 54, 108 या संख्येने मणी असतात. नामजपासाठी तिचा वापर केला जातो.मुलतानी मातीच्या गोपीचंदनाचे ठसे, अबीर बुक्का, गेरूच्या रंगात बुडवून काढलेले जाड्या भरड्या कापडाचे निशाण आणि तशाच काही पताका ही वारकरी संप्रदायाची खास ओळख आहे.

वारकरी संप्रदाय हा भोळ्याभाबड्या लोकांचा, विठ्ठलावर श्रद्धा असणाऱ्यांचा पण अंधश्रद्धा नसणाऱ्यांचा आहे. हा संप्रदाय सन्मार्गाने विहित कार्य करीत विठ्ठलाचे नामस्मरण करीत शेवटी पांडुरंग चरणी लीन होऊन मोक्ष मिळविण्याचा साधा सोपा मार्ग वारकऱ्यांना दाखवतो. भक्ती आणि शक्ती एकत्र आली की मानवी समाज सुलतानी व अस्मानी संकटाचा सामना करतो.

हा अपूर्व सोहळा जगात एकमेवाद्वितीय आहे.


वारकरी संप्रदाय साडेसातशेहून अधिक वर्षं टिकून आहे. कालौघात या संप्रदायाला काहीसे आक्रमक स्वरूप येत आहे. परंतु वारकरी संप्रदायाने आपले बिगर राजकीय, उदार, सहिष्णु आणि प्रवाही रूप कायम ठेवले, मात्र अतिरेकी भेदभाव वादी उजव्या शक्ती मागील दोन दशके वारीत वावरत असल्या तरी वारीचा समतेचा प्रवाह सर्वजन हिताय असाच आहे. सामाजिक क्रांती, परिवर्तन, पुरोगामी, डाव्या मंडळींना वारीतील कष्टकरी, गरीब शेतकरी शेतमजूर दिसला नाही. आजही दिसत नाही. वारीमध्ये समतेचा विषमतेला नाकारणारा विचार आहे. पण तुकोबांची गाथा आणि ज्ञानेश्वरी ओव्या आजही सामाजिक परिवर्तनाचा संदेश देत आहेत. (Ashadhiwari 2024)

विठुचा गजर हरीनामाचा झेंडा कुणी रोविला


संत तुकाराम महाराज स्वतः नेहमी 1400 टाळकरी घेऊन देहू येथून प्रत्येक शुद्ध एकादशीला पंढरपूरला जात असत. तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे पुत्र नारायण महाराज ह्यांनी ह्या वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. एकोणिसाव्या शतकापासून संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताई, संत एकनाथ महाराज, संत जनार्दन स्वामी, संत सावतामाळी आणि रामदास स्वामी ह्यांच्याही पालख्या पंढरपूरला येऊ लागल्या.

इसवी सन 596 च्या ताम्रपटात पंढरपूर व त्यानंतरच्या काही शिलालेखांत सुद्धा पंढरपूरच्या विठोबा मंदिराचा उल्लेख आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गाव, शाळा, मंदिरे, चावड्या, गल्ली, वस्ती वाडी वारीमय होते. औद्योगिक शहरात आषाढी एकादशीला विठुरायाचा गजर पहाटे सुरू होतो. आभाळ माया सर्वत्र पसरते,समाज पावसाने चिंब होतो, भक्तिरसात दंग होतो. मनापासून मनापर्यंत आनंदी आनंद होतो. म्हणून विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला. धन्यवाद !


क्रांतीकुमार कडुलकर
WE TOGETHER FOUNDATION
‘ट्रॅक कंपोनन्ट्स’च्या कामगारांना तब्बल साडेबारा हजारांची वेतनवाढ !


ज्येष्ठ नागरिक त्रिवेणीनगर संघाचा 14 वा वर्धापन दिन संपन्न

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

संबंधित लेख

लोकप्रिय