महाराष्ट्र जनभूमी : जीवाश्मपासून तयार करण्यात येणाऱ्या इंधनामुळे भारतात दरवर्षी २ लाख जणांचा मृत्यू होतो. या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हे घडते. भारतासह अनेक देशांमध्ये प्रामुख्याने कोळसा आणि डिझेल ही जैविक इंधने वापरली जातात, त्यांच्यामुळे २०१८ मध्ये जगभरात सुमारे ८० लाख मृत्यू झाले आणि त्यात भारताचा वाटा ३०.७ टक्के होता, असा हार्वर्ड विद्यापीठ, बर्मिंगहॅम विद्यापीठ जाणि लंडन महाविद्यालय यांच्या संयुक्त अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी ‘पीएम – २.५’ या अतिसूक्ष्म घातक कणांवर आधारित असते. मात्र, जैविक इंधनांमुळे किती मृत्यू होऊ शकतात याची आकडेवारी उपलब्ध नव्हती. अंतराळात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांच्या मदतीमुळे ही माहिती मिळाली आहे.
या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी ‘नॅशनल स्पेस अँड एरोनॉटिक्स अॅडमिनिस्ट्रेशन’ ( नासा ) या संस्थेच्या ‘ ग्लोबल मॉडेलिंग अँड अॅसिमिलिशेन ऑफिस मधील गोडर्ड अर्थ ऑब्झर्व्ह शन सिस्टिम ‘ ( जीइओएस ) या मॉडेलची मदत घेतली. हवेत असलेल्या ‘पीएम -२.५’ कणांचा स्रोत शोधणे त्यामुळे शक्य होते. जैविक इंधनांमुळे २०१८ मध्ये जगभरात ८० लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी या मॉडेलच्या आधारे काढला आहे.
जैविक इंधनांमुळे होणाऱ्या मृत्यूंची जगभरातील टक्केवारी २०१२ मध्ये २१.५ होती आणि २०१८ मध्ये ती १८ टक्क्यांवर आली. जैविक इंधनांच्या मानकांबाबत कडक नियमावलीमुळे हे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात आले.