इंडोनेशिया : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे (Indonesia Jakarta Mosque Fire) बुधवारी एका मशिदीला भीषण आग लागुन मशिदीवरील भव्य घुमटही कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, जकार्ता मधील इस्लामिक सेंटर हि मशिद असून या मशिदीच्या घुमटाचं काम सुरू होते, त्यावेळी या मशिदीच्या घुमटाला अचानक आग लागली, स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यानंतर अग्निशामक दलाला आगीची माहिती मिळाली. यानंतर जवळपास १० अग्निशमन गाड्या घटनास्थळावर पाठवण्यात आल्या. मात्र बघता बघता ही आग प्रचंड वेगाने परिसरात पसरली. त्यानंतर काही वेळेतच हा घुमट जमीनदोस्त झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या मशिदीचा घुमट कोसळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, या प्रकरणी मशिदीच्या घुमटाचं काम करणाऱ्या कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस आगीच्या कारणांचा तपास करत आहे. मात्र, अद्याप मशिदीला आग कशी लागली याबाबत अधिकृत कारणं सांगण्यात आलेले नाहीत.