मावळ : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा अखिल भारतीय जनवादी महिला संघटना शाखा सुदवडी यांच्या वतीने निषेधाचा ठराव करून कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली वाहण्यात आली. सुदवडी शाखेच्या वतीने संध्याकाळी सात वाजता सर्व महिला मुले नागरिकांच्या वतीने कॅन्डल मार्च आयोजित केला होता. कार्यक्रमाची प्रस्तावना सुप्रिया जगदाळे यांनी केली.
यावेळी बोलताना अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा अपर्णा दराडे म्हणाल्या, आजूबाजूची भय व परिस्थिती पाहता महिलांनी संघटित राहून अन्याय अत्याचारा विरोधात लढा देण्यासाठी निर्भयपणे उभे राहिले पाहिजे. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करणे काळाची गरज आहे. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, मुलांना चांगल्या वाचनाचे संस्कार देणे खूप गरजेचे आहे. चांगला समाज घडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करून आरोपी वर कारवाई झाली पाहिजे. त्या मुलीच्या आई-वडिलांच्या दुःखामध्ये अखिल भारतीय जनवादी महिला संघटना म्हणून आम्ही सर्वजण सहभागी आहोत असे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे म्हणाले, समाजातील वाईट प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही तर अशा घटना घडतात. त्यामुळे वाईट प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्याचे आवाहन महिलांना केले. समाजकंटकांना महिलांनी एकजूट करून धडा शिकवावा, महिलांनी सजग राहून कायद्याचा आधार घ्यावा असे मत व्यक्त केले.
तर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया चे सुदवडी शाखेचे अध्यक्ष पावसू करे म्हणाले, घडलेल्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध, अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाल्या पाहिजेत, असे गुन्हे फास्टट्रॅक कोर्टात चालवले पाहिजे. पीडित मुलीच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, असे मत व्यक्त करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.
यावेळी सुदवडी शाखेचे ज्येष्ठ नागरिक उत्तम जाधव, मंगलाताई जाधव, अशोक उजागरे, पुष्पा उजागरे, नारायण काळे, ज्योती काळे, चंद्रकांत जाधव, शितल जाधव, महादेव सुरवसे, पार्वती सुरवसे, उमेश कोकलवार, शिवानी कोकलवार, मनीषा जाधव, संभाजी जाधव, महिला कार्यकर्त्या रूपाली कदम, सुप्रिया जगदाळे, मंगलाबाई जाधव, शामा डेचे, सोनी खवाटे, विद्या पवार, मीना सूर्यवंशी, भाग्यश्री उडगी, ताई सूर्यवंशी, साई सृष्टी सुदवाडी येथील लहान मुले मुली उपस्थित होत्या.