Saturday, October 1, 2022
Homeजिल्हाआशा व गटप्रवर्तकांना शासनाने किमान वेतन व भाऊबीजेची भेट द्यावी - कॉम्रेड...

आशा व गटप्रवर्तकांना शासनाने किमान वेतन व भाऊबीजेची भेट द्यावी – कॉम्रेड राजू देसले

भंडारा : तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना शासनाने 24 हजार रुपये किमान वेतन द्यावे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीत भाऊबीज भेट द्यावी अशाप्रकारचेे मनोगत जिल्हा अधिवेशना प्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले नाशिक यांनी व्यक्त केले.

आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचे भंडारा जिल्हा अधिवेशन दिनांक 6 ऑगस्ट 2022 ला शारदा लाॅन्स भंडारा येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष काॅ. शिवकुमार गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आयटकचे सरचिटणीस कॉम्रेड शाम काळे यांनी केले तर संघटनेचे राज्य अध्यक्ष महाराष्ट्र आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले हे प्रमुख मार्गदर्शक होते. आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड माधवराव बांते व भाकपचे जिल्हा सचिव आणि दलित अधिकार आंदोलनाचे समन्वयक काॅ.हिवराज उके यांनी शुभेच्छापर संदेश दिले. मंचावर सुनंदा दहिवले, भूमिका वंजारी, निरू जांभुळकर, देवांगणा सयाम विराजमान होत्या.

सर्वप्रथम राज्यातील कामगार कर्मचाऱ्यांचे दिवंगत पुढारी कॉम्रेड मनोहर टाकसाळ, कॉम्रेड नामदेव गावडे, प्राचार्य शिवदास उटाणे व आशा कर्मचारी रेखा पारधी तसेच कोविड काळात मृत्यू पावलेल्या आशा कर्मचारी इत्यादींना आदरांजली वाहण्यात आली.

राजू देसले पुढे बोलताना म्हणाले की, अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांना शासनाने मागील चार पाच वर्षात एक रुपयासुद्धा वाढ दिली नाही. उलट या देशातील भांडवलदारांना दीड लाख कोटीची सूट दिली. कोविड काळात जीवाची पर्वा न करता चोवीस तास काम करणाऱ्या आशांना कौतुका पलीकडे काहीच दिले नाही. तर स्वतःचे वेतन, पेन्शन वाढवून घेणारे आमदार-खासदार यांनी काहीच केले नाही म्हणून आमदार-खासदारांनाआधी निवेदन व नंतर त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे आव्हान करण्यात आले.

उद्घाटन कॉ.शाम काळे म्हणाले की, आयटक ला 102 वर्षाच्या संघर्षाचा इतिहास आहे. व्यवस्था परिवर्तनासाठी आपला लढा असून समाजवादी भारत निर्माण करण्याचे आपले स्वप्न आहे. आयटक ने लढून मिळविलेले 28 कामगार कायदे मोदी सरकारने घालवले असून कामगार विरोधी 4 श्रमसंहिता आणल्या आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. आयटकच्या नेतृत्वात दिल्ली ला आंदोलन करणार आहोत तर येत्या डिसेंबर महिन्यात नागपूर हिवाळी अधिवेशनात आशांचा कुटुंबासोबत मोर्चा काढण्यात येणार आहे. आशा गटप्रवर्तकांना वेतन श्रेणी तसेच सहा महिन्याची प्रसूती रजा, दिवाळी बोनस, भाऊबीज मिळाला पाहिजे याकरिता संघर्षासाठी सज्ज झाले पाहिजे. याप्रसंगी जिल्हा परिषद एनआरएचएम योजनेचे समूह संघटक चंदू बारई यांनीही मार्गदर्शन केले.

अधिवेशनात काही निर्णय घेण्यात आले – त्यात 22 ऑगस्टला भंडारा जिल्हा परिषदेवर मोर्चा व सप्टेंबरमध्ये खासदार कार्यालयावर प्रथम निवेदने नंतर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक आशा व गटप्रवर्तकानी आयटकच्या स्थापना दिनी 31 ऑक्टोबरला आपल्या घरावर आयटकचा लाल ध्वज लावला पाहिजे. याप्रसंगी 23 लोकांची जिल्हा कार्यकारणी निवडण्यात आली त्यात शिवकुमार गणवीर, राजू बडोले, माधवराव बांते, हिवराज उके आशिषा मेश्राम, सुनंदा दहिवले, भूमिका वंजारी, साधना बडोले, लोभा सोनवाने, श्यामकला कांबळे, सरिता नारनवरे इत्यादींचा समावेश आहे.

संचालन सुनंदा दहिवले यांनी तर आभार श्यामकला कांबळे यांनी मानले. अधिवेशनात सुमारे सात-आठशे आशा गटप्रवर्तक उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजू बडोले, गजानन पाचे, ताराचंद देशमुख, वामनराव चांदेवार, राजू लांजेवार, युवराज शिंगाडे इत्यादींनी सहकार्य केले.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय