जुन्नर : ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त उसरान येथे कार्यक्रमावेळी आदिवासी संस्कृती ही जगातील सर्वात प्रगत संस्कृती असून हा ठेवा जपण्याची गरज आहे. आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास, स्वतंत्रलढ्यातील आदिवासींचे योगदान, आदिवासी चळवळी यांबाबत तथाकथित व्यवस्थेने कधी पुढे येऊ दिले नाही. ते या समाजव्यवस्थेने सोयीस्रीत्या दडपण्याचे, लपवण्याचे काम केलेले आहे. आदिवासी समाज हा मागास समाज नसून आदिवासी संस्कृती जगातील सर्वात प्रगत संस्कृती असल्याचे, असे प्रतिपादन झेप फौंडेशन पुणे चे प्रसाद झावरे यांनी केले.
उसराण येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आदिवासी पीपल्स फेडरेशनचे मारूती वायळ होते.
आदिवासी समाजाला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळावेत आणि हा समाज मुख्य प्रवाहाशी जोडला जावा. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जयपाल सिंग मुंडा यांच्या प्रयत्नांनी राज्यघटने मध्ये अनेक तरतुदी केल्या गेल्या. परंतु स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात राज्यघटनेतील या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकडे शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याने आजही हा समाजाचा आर्थिक विकास होऊ शकाला नाही. मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेला निधी जाणीवपूर्वक अखर्चिक ठेवून तो इतर विभागांकडे वर्ग केला जात आहे. यामुळे आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या मागास रहात असल्याचे किसान सभेचे उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांनी या कार्यक्रमावेळी सांगितले.
आदिवासी समाजासाठी असलेला वनहक्क कायदा, पेसा कायदा, रोजगार हमी योजना कायदा याच बरोबर शासनाच्या विविध योजना कार्यक्षमपणे राबविण्यासाठी आदिवासी समाजाने संविधानिक मार्गाने लढा देण्याची गरज असल्याचे मुक्त पत्रकार नवनाथ मोरे यांनी सांगितले. यावेळी किसान सभेचे तालुका कोषाध्यक्ष नारायण वायाळ, पोलीस पाटील संतोष वायाळ, अमित वायाळ आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.