मुंबई : दि. 01 ऑगस्ट, लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती देशभर ” लेखन प्रेरणा दिन ” म्हणून शासनाच्या वतीने अधिकृतपणे घोषित करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे पत्र पाठवून जोरदार मागणी केली आहे.
यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, राज्य शासनाद्वारे अनेक ज्येष्ठ समाजसुधारक, थोर नेते, अभ्यासक, यांच्या जयंतीचे निमित्त साधून विशेष दिन म्हणून आपण साजरे करतो. त्याअनुषंगाने लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे फक्त एकच दिवस शाळेत गेले होते. परंतु, त्यांनी मराठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लिखाणाने इतिहास घडवला.” दलित साहित्या” चा पाया रचण्यात कॉ. अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लेखन केले. कथा, कादंबरी, नाटक, पोवाडा लावण्या, चित्रपट पटकथा लेखन या क्षेत्रात त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. कॉ. अण्णाभाऊ साठे यांनी कलावंत म्हणून लोकनाट्य, नाटक, चित्रपटातून उत्कृष्ट भूमिकाही केल्या होत्या. ते अष्टपैलू साहित्यिक, कलावंत होते.”
इंडियन पिपल्स थियेटर असोसिएशन “(इप्टा), या सुप्रसिद्ध पुरोगामी नाट्य संस्थेचे ते अखिल भारतीय अध्यक्षही होते. त्याकाळात त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, सूप्रसिध्द नाट्य सिने कलावंत बलराज सहानी आदी कार्य करीत असत. कॉ. अण्णाभाऊ साठे फक्त केवळ लेखक, कलावंत नव्हते, तर ते प्रत्यक्ष येथील दलित – शोषित, कामगार, शेतकऱ्यांच्या शोषण मुक्तीच्या चळवळीत, स्वातंत्र्य चळवळीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, गोवा मुक्ती आंदोलनत सक्रिय सहभागी होते. तुरूंगवासही भोगला होता. कम्युनिस्ट पक्षाच्या ” लाल बावटा कला पथका ” द्वारे कॉ. अण्णाभाऊ साठे शाहीर कॉ. अमर शेख, शाहीर कॉ. दत्ता गव्हाणकर यांच्या मदतीने त्यांनी आपल्या गाणी, पोवाडे, लोकनाट्यातून महाराष्ट्राच नव्हे तर देश ढवळून काढला व प्रचंड जनजागृती करून मोठे योगदान दिले.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील विविध विद्यापीठातील तरूण संशोधक आज अण्णा भाऊंच्या साहित्य, कर्तृत्वावर अभ्यास, संशोधन करीत आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या हयातीतच त्यांच्या साहित्याचे, पोवाड्यांचे भारतातील विविध भाषांत अनुवाद झालेत. एवढेच नव्हे तर इंग्रजी, रशियन, झेक, पोलीश, जर्मन, फ्रेंच आदी भाषांतही अनुवाद होऊन ते जगभर गेले आहे. सातासमुद्रा पार अण्णाभाऊ आपल्या साहित्याने तळपत आहेत. असे असतानाही प्रस्थापित हिंदू जात – वर्गिय व्यवस्थेचे समर्थक आणि ब्राम्हणी – भांडवली साहित्य संस्कृतीच्या ठेकेदारांनी, तळागाळातील दलित – शोषित समाजातून आलेल्या कॉ. अण्णा भाऊ साठे यांची जिवंत असताना तर उपेक्षा केलीच, परंतु मृत्यूनंतरही व त्यांचे 2020 हे जन्म शताब्दी वर्ष सरल्या नंतरही, ही उपेक्षा आजतागायत चालू आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा सतत घोष करणाऱ्या महाराष्ट्र राज्यासाठी आणि साहित्य – संस्कृती क्षेत्रासाठी ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे. असे आ. निकोले म्हणाले.
तसेच, महाराष्ट्र राज्याने आणि साहित्य क्षेत्राने अण्णा भाऊंच्या उपकारातून उतरायी होण्यासाठी दि. 01 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस देशभर लेखन प्रेरणा दिन म्हणून शाळा, महाविद्यालयांमध्ये साजरा करावा, असे आम्हाला वाटत आहे. आणि याचा प्रारंभ महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन करावा कारण कॉ. अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रात जन्मले होते. दि 18 जुलै कॉ. अण्णा भाऊ साठे यांचा स्मृती दिन होता. आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत आहोत की, येणारा दि. 01 ऑगस्ट हा अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दिवस, जयंती आहे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दि. 01 ऑगस्ट हा ” लेखन प्रेरणा दिन ” म्हणून शासनाच्या वतीने अधिकृतपणे घोषित करण्यात यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केली आहे.
दरम्यान सदरहू निवेदन उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुख्य सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे शिक्षण सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांना देखील देण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री सचिवालयाकडून कार्यवाहीसाठी प्रशासकीय सुधारणा विभागास पाठविण्यात आला आहे अशी देखील माहिती आ. निकोले यांनी दिली. याप्रसंगी किसान सभा डहाणू अध्यक्ष कॉ. चंद्रकांत घोरखाना, माकप सांस्कृतिक आघाडी सचिव सुबोध मोरे उपस्थित होते.