महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत मालमत्तांसंबधी ज्याप्रमाणे नव्या मालमत्तांची कर आकारणी करुन कर वसूल करणे हे कर संकलन विभागाचे प्रथम महत्वाचे काम असून उपरोक्त कामाबरोबर मालमत्तेचे संबंधित योग्य व्यक्तिच्या नावावर हस्तांतरण करणे सुध्दा महत्वाचे काम आहे. (PCMC)
१५ व्या वित्त आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागास आपल्या विभागाची माहिती पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण (इंटिग्रेशन) करण्याचे निर्देश दिले होते.
उपरोक्त निर्देशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे व पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण (इंटिग्रेशन) पुर्ण झाले आहे. त्यामुळे आता नोंदणी व मुद्रांक विभागाच्या मालमत्तेच्या खरेदी – विक्रीबाबतच्या दस्तांबाबत अद्ययावत माहिती संगणक प्रणालीच्या माध्यमातून थेट पिंपरी – चिंचवड महापालिकेला दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ पासून उपलब्ध होत आहे.(PCMC)
यामुळे आता मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुध्दा तात्काळ होणार आहे. यामुळे मालमत्तेची खरेदी किंवा विक्री झाल्यानंतर सदर मालमत्तेचे हस्तांतरण होणारा विलंब यापुढे टाळला जाऊन मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया गतिमान होणार आहे.
सदरची प्रक्रिया ऑनलाइन सेवेद्वारे आपोआप होणार असल्यामुळे नागरिकांना मालमत्ता हस्तांतरणासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. किंबहुना नागरिकांनी मालमत्ता हस्तांतरणासाठी अर्ज केला नाही तरी हस्तांतरण प्रक्रिया आपोआप विहित मुदतीत पार पडणार आहे.
कारण महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या ऑनलाइन माहितीच्या आधारे पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेस मालमत्ता विक्री करणार, मालमत्ता खरेदी करणार, मालमत्ता नोंदणी दिनांक व मालमत्तेचा व्यवहाराचा तपशिल प्राप्त होणार आहे.
पिंपरी – चिंचवड महानगरपालिका सर्वप्रथम मालमत्ता विक्री करणाऱ्याचे नाव, खरेदी करणाऱ्याचे नाव, विक्री मालमत्तेचा संपूर्ण तपशील तपासणार आहे. उपरोक्त तपशील अचूक भरल्याची खात्री झालेनंतर मालमत्तेचे बाजारमूल्य अथवा मुद्रांक शुल्क ज्या रकमेवर भरणा केले आहे यापैकी जी रक्कम सर्वौच्च असेल त्या रकमेवर ०.५० टक्के इतके मालमत्ता हस्तांतरण शुल्काची आकारणी करुन मालमत्ताधारकांस हस्तांतरण शुल्काची एकूण रक्कम ऑनलाइन स्वरुपात भरणा करण्यासाठीची लिंक एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे.
मालमत्ताधारकांनी त्यांना प्राप्त एसएमएसद्वारे मालमत्ता हस्तांतरण शुल्काची रक्कम तात्काळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरणा करावी. याबरोबरच, मालमत्ताधारकांनी हस्तांतरण शुल्काच्या रकमेचा भरणा विहीत मुदतीत न केल्यास मालमत्ता कराच्या पुढील बिलामध्ये हस्तांतरण शुल्काचा समावेश करण्यात येणार आहे.
याचबरोबर, यापुढे ज्यांना मालमत्ता खरेदी अथवा मालमत्ता विक्री करावयाची आहे अशा नागरिकांनी मालमत्तेच्या दस्ताची नोंद करतेवेळी आपला मालमत्ता क्रमांक नमूद करावा. असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर !
शहरातील मालमत्ताधारकांना मालमत्ता हस्तांतरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन दिली. परंतू नागरिकांच्या मालमत्ता खरेदी – विक्रीची माहिती थेट कर संकलन विभागाला उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागास पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण करण्यात आले आहे.
नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मालमत्ता हस्तांतरण प्रणालीमध्ये बदल करण्यासाठी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका कटीबध्द असून सदर प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांचा वेळ वाचवून त्यांना जलद सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
–शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
संगणक प्रणालीशी करण्यात आलेल्या एकात्मीकरणामुळे प्रशासकीय कामकाजात गतिमानता येणार!
१५ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण पुर्ण झाल्यामुळे प्रशासकीय कामकाजामध्ये गतिमानता येणार आहे. आता नागरिकांना मालमत्ता हस्तांतरणासाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नसून मालमत्तेची खरेदी – विक्रीची प्रक्रिया केल्यानंतर त्याबाबतची माहिती तात्काळ करसंकलन विभागाला प्राप्त होऊन सदर मालमत्तेचे हस्तांतरण प्रक्रिया पुर्ण होणार आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेमध्ये बचत होऊन प्रशासकीय कामकाजात गतिमानता येणार आहे.
– प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
प्रशासकीय कामकाज पारदर्शक व सुलभ होणार!
महाराष्ट्र शासनाचा नोंदणी व मुद्रांक विभागाचे महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण करण्याचे १५ वित्त आयोगाने निर्देश दिले होते. त्यानुसार दोन्ही विभागाच्या संगणक प्रणालींचे एकात्मीकरण करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली असून मालमत्तेच्या खरेदी व विक्री बाबतची इंत्यभूत माहिती विभागाला मिळण्यास सुध्दा सुरुवात झाली आहे. सदर प्रणालीमुळे विभागाच्या प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता निर्माण होऊन हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये विलंब न लागता ती प्रक्रिया सुलभ होणार आहे.
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका