Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : च-होलीतील भाजी मंडईच्या कामाला ‘चालना’, भाजपा आमदार महेश लांडगे यांचे...

PCMC : च-होलीतील भाजी मंडईच्या कामाला ‘चालना’, भाजपा आमदार महेश लांडगे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांच्या पाठपुराव्याला यश (PCMC)


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : झपाट्याने विस्तारलेल्या च-होली परिसरातील म्हसोबा चौकातील भाजी मंडईचा प्रश्न अखेर सुटणार आहे. भाजी विक्रेत्यांची अडचण सोडविण्यासाठी मंडईतील स्वच्छतागृहासह उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. भाजी मंडईसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. (PCMC)

महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर समाविष्ट भागातील विकास कामांना चालना मिळाली. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्हिजन 20-20 च्या माध्यमातून समाविष्ट गावांचा विकास करण्यावर भर दिला. पाणीपुरवठयासह सर्व सोयी सुविधा सक्षमपणे उपलब्ध झाल्या. परिणामी, या भाग झपाट्याने विस्तारला. मोठ मोठ्या गृहनिर्माण संस्था झाल्या. त्यामुळे या परिसरातील लोकसंख्येत मोठी वाढ झाली.

वाढत्या नागरिकांसाठी भाजीपाला खरेदी करण्याकरिता च-होली बुद्रूक परिसरातील म्हसोबा चौकामध्ये भाजी मंडई उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांनी महापालिका प्रशासन आणि आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. त्यानुसार भाजी मंडईचे काम हाती घेण्यात आले. मंडईचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. परंतु, स्वच्छतागृहाची सुविधा नव्हती. यासह किरकोळ कामे शिल्लक होती. यामुळे भाजी विक्रेत्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. याची दखल घेत आमदार लांडगे यांनी जागेवर जाऊन कामाची पाहणी केली. अधिकाऱ्यांना बोलावून घेत तत्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

प्रतिक्रिया :

च-होली परिसर झपाट्याने विस्तारला आहे. या भागातील नागरिकांची भाजी मंडईची मागणी होती. त्यानुसार आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून मंडईचे काम पूर्णत्वास आले. लवकरच मंडई सुरू केली जाईल. त्यामुळे नागरिक आणि भाजी विक्रेत्यांची अडचण दूर होणार आहे.

सचिन तापकीर, सामाजिक कार्यकर्ते, चऱ्होली.

संबंधित लेख

लोकप्रिय