पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि गर्जे मराठी ग्लोबल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मागील दहा पंधरा वर्षांत जागतिक आर्थिक आलेखात भारताने आपली ओळख आणि उपयुक्ता सिध्द केली आहे. भारताच्या आर्थिक विकासात स्टार्टअप्सचे योगदान महत्त्वाचे आहे. स्टार्टअप्सच्या वाढीसाठी तसेच प्रभावी संशोधन, विकासासाठी पीसीयु आणि गर्जे मराठी ग्लोबलच्या वतीने सुरू केलेले इनक्युबेशन सेंटर प्रभावी व्यासपीठ मिळवून देईल, असे प्रतिपादन गर्जे मराठी ग्लोबलचे सह-संस्थापक आनंद गानू यांनी केले. (PCMC)
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि गर्जे मराठी ग्लोबल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन गानू यांच्या हस्ते पीसीयु साते मावळ येथे सोमवारी (२६ ऑगस्ट) करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय व्यवसाय वृध्दी तज्ज्ञ माधव दाबके, डिजिटल क्षेत्रातील तज्ज्ञ सागर बाबर, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, नियोजन मंडळ सदस्य सचिन इटकर आदी उपस्थित होते.
गर्जे मराठी ग्लोबल हे अनिवासी मराठी व्यक्तींना पुन्हा मातृभूमीशी जोडून एकत्रित करण्यासाठी समर्पित एक गतिमान आणि सर्वसमावेशक व्यासपीठ आहे. ज्यांना ज्ञान, शिक्षण आणि उद्योजकतेबद्दल मनापासून इच्छा आहे. हा जागतिक समुदाय उद्योजकतेच्या उत्कटतेने सर्व स्तरातील लोक आणि विद्यार्थ्यांना सामाजिक, सांस्कृतिक ओळख करून देतो आणि शैक्षणिक, व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देतो, असे सचिन इटकर म्हणाले.
पीसीयु मध्ये सुरू झालेले इनक्युबेशन केंद्र नाविन्य आणि उद्योजकतेचे केंद्रबिंदू ठरेल. विद्यार्थ्यांना उद्योगशीलता, व्यवसायिक गतिशीलतेसाठी महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल, असा विश्वास डॉ. मणीमाला पुरी यांनी व्यक्त केला.
नाविन्यपूर्ण आणि उद्योजकतेची संस्कृती वाढवण्यासाठी विद्यापीठ वचनबद्ध आहे असे डॉ. सुदीप थेपडे यांनी सांगितले.
भविष्यात उद्योजक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन माधव दाबके यांनी केले.
आजच्या डिजिटल युगात डिजिटल साक्षरता आणि सजगतेची गरज आहे. मानसिक आरोग्यासह तांत्रिक प्रगतीचा समतोल साधणाऱ्या नवकल्पनांसाठी विद्यार्थ्यांनी सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला पाहिजे, असे सागर बाबर म्हणाले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विविध विद्याशाखेचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. सुदीप थेपडे यांनी आभार मानले.