पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरात झालेल्या सलग तीन दिवस मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अनेक नागरी वसाहतींमध्ये लोकांच्या घरामध्ये कमरे इतके पाणी शिरले. शहरातील आकुर्डी, चिखली, रुपीनगर, चिंचवडगाव, पिंपरी कॅम्प, नेहरूनगर, मोशी या व इतर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याचे दिसून आले. (PCMC)
स्मार्ट सिटी म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त केलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिका पावसाळ्यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन करण्यामध्ये अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
मान्सून पूर्व तयारी करण्यामध्ये महापालिका प्रशासन अपयशी ठरलेले आहे. शहरा मधील नद्यांमध्ये टाकलेला भराव, बंद केलेले ओढे नाले, पूर नियंत्रण कक्षाची अकार्यक्षमता, चुकीच्या पद्धतीने केलेली विकास कामे, अनधिकृत बांधकामांवर नसलेले नियंत्रण या सर्वांमुळे एकाच पावसामध्ये शहरातील नागरिकांचे आयुष्य धोक्यामध्ये आलेले आहे. (PCMC)
आता, पाऊस अंदाजापेक्षा अधिक पडला असे कारण देऊन पळवाट शोधण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळे ज्या लोकांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी, पुरामुळे स्थलांतरित केलेल्या लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा तातडीने योग्य पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आम्ही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे करत आहोत.
मानव कांबळे
अध्यक्ष – नागरी हक्क सुरक्षा समिती.