महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019
बीड(प्रतिनिधी):- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव असलेल्या जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी यादीतील त्यांचा विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांसह नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सामुदायिक सेवा केंद्रावर जाऊन आपले कर्जखात्याची आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवाजी बडे, जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांनी कळविले आहे.
शासन निर्णयातील निकषानुसार लाभ अनुज्ञेय असलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या याद्या दि.२४ व २८ फेब्रुवारी तसेच २७ एप्रिल व १८ मे २०२० रोजी शासनाचे पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु मार्च महिन्यात कोविड-१९ चे संसर्गाचे प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेशान्वये आपले सरकार सेवा केंद्र , सामुदायिक सेवा केंद्रावर लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. तसेच दरम्यानच्या काळात शासनाचे संबंधित पोर्टल वर आधार प्रमाणीकरण प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती.
शासनाचे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 बाबतचे पोर्टलवर दि.१७ जून २०२० पासून ज्या शेतकऱ्यांची नावे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नमूद आहेत, त्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आधार प्रमाणीकरण करताना सर्व आपले सरकार सेवा केंद्रचालक, सामुदायिक सेवा केंद्र चालक व शेतकरी सभासदांनी जिल्हाधिकारी, बीड यांचे आदेशान्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अटी व शर्तींचे तसेच सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर व इतर सर्व आनुषंगिक उपाययोजनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००