सोवेटा : साऊथ आफ्रीकेतील सोवेटा टाऊनशिप मधील जोहान्सबर्ग जवळील भागात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये १४ लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
पोलीस अधिकारी इलियास मावेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक एन्जॉय करत असतानाच या बार मध्ये हल्लेखोर घुसले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. या घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघांची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी रात्री १२. ३० च्या सुमारास ही घटना घडली. हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
पुढे ते म्हणाले की, ‘अचानक या लोकांनी बंदुकीचा आवाज ऐकला आणि बारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमागचा हेतू काय आणि या लोकांना का लक्ष्य करण्यात आले. याबाबत सध्या आमच्याकडे संपूर्ण माहिती नाही.” मात्र, ‘या हल्ल्यात ‘हाय कॅलिबर’ बंदुका वापरण्यात आल्या असून त्या अंदाधुंद गोळीबार करत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांच्या संख्येवरून ही गुन्हेगारांची एक मोठी टोळी असल्याची शक्यता आहे. या सगळ्या घटनेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या भागात पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवला आहे.