नाशिक प्रतिनिधी:
इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु असून पहिल्या फेरीत नाशिक विभागातील विविध शाखांच्या रिक्त जागांसाठी 12 हजार 131 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अद्याप 8,485 जागा रिक्त आहेत, अशी माहिती प्र. शिक्षण उपसंचालक प्रविण पाटील यांनी दिली.
नाशिक विभागात विज्ञान शाखेसाठी 10 हजार 320 जागा आहेत. वाणिज्य शाखेसाठी 8 हजार 680 तर कला शाखेसाठी 4 हजार 910 जागा उपलब्ध आहेत. एचएसव्हीसीसाठी 1 हजार 43 जागा आहेत. या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांची टक्केवारी लक्षात घेऊन प्रवेशाची पहिली फेरी उपसंचालक कार्यालयाने जाहीर केली. विज्ञान शाखेसाठी 5 हजार 504, वाणिज्य शाखेसाठी 4 हजार 258 तर कला शाखेसाठी 2 हजार 186 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
एचएसव्हीसीसाठी अवघ्या 183 विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे. या सगळ्या शाखा मिळून एकूण 25,070 जागा उपलब्ध असून पहिल्या फेरीअंती एकूण 12,131 जागा भरल्या गेल्या आहेत. या जागा भरताना आरक्षणाचाही विचार करण्यात आला आहे.