पुणे : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे निकाल कसा प्रसिद्ध करावा, तसेच अकरावीमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या गुणांच्या आधारे प्रवेश द्यावा, असा प्रश्न शिक्षण विभागा समोर उभा राहिला होता. मात्र, ऑनलाईन सर्वेक्षणातून त्यावर तोडगा निघाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निकालाचा व प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापन च्या आधारे प्रसिद्ध करण्यास तयार असणाऱ्या शाळांचा अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने मागविला होता. तसेच इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घ्यावी का? ह्यावरही ऑनलाइन मतं नोंदविण्याचे आवाहन केले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सर्वांना ऑनलाईन सर्वेक्षणाद्वारे अभिप्राय नोंदवण्याची संधी उपलब्ध होती. परंतु, मंगळवारी सायंकाळपर्यंत ६५ टक्के मते सीईटी घ्यावी, या बाजूने नोंदवली आहेत, तर ८० टक्क्यांहून अधिक शाळा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यास अनुकूल असल्याचे ऑनलाईन सर्वेक्षणातून दिसून आले आहे. अकरावी प्रवेशासाठी राज्य शासनाने सीईटी परीक्षा घ्यावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील काही व्यक्तींकडून केली जात आहे. परंतु, ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे सध्या परिस्थितीत शक्य दिसत नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्याचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे अशीही चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.