Monday, May 20, 2024
Homeराज्यराज्यातील १० महत्वाच्या बातम्या; वाचा एक क्लिक वर.

राज्यातील १० महत्वाच्या बातम्या; वाचा एक क्लिक वर.

१. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या २ लाख ३० हजार ५८९.

मुंबई : राज्यात आज ६ हजार ८७५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. व एकूण संख्या आता २ लाख ३० हजार ५९९ अशी झाली आहे. आज नवीन ४ हजार ०६७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख २७ हजार २५९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ९३ हजार ६५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

२. जुलै महिन्यात आता पर्यंत ५ लाख ८१ हजार ७८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ

मुंबई :  राज्यातील ५२ हजार ४२९ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. १ जुलै ते ९ जुलै पर्यंत राज्यातील ४० लाख ५० हजार ३२ शिधापत्रिका धारकांना ५ लाख ८१ हजार ७८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले, असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

३. जुलै महिन्यात ८ लाख ८७ हजार ५६० शिवभोजन थाळ्यांचे वाटप.

मुंबई :  राज्यात दि. १ जुलै ते दि. ९ जुलै पर्यंत 859 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे ८ लाख ८७ हजार ५६० शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली

राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलैमध्ये आतापर्यंत 8 लाख 87 हजार 560 आणि असे एकूण दि.1 एप्रिल ते दि. 9 जुलै या कालावधीत 98 लाख 67 हजार 89 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.

४. व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता ‘कौशल्य विकास परीक्षा मंडळ’.

मुंबई : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता “महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ” (Maharashtra State Board of Skill Development Examination) असे करण्यात आले आहे. राज्यातील कौशल्य विकासाला गती देणे आणि त्यामाध्यमातून बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. कौशल्य विकास विभागामार्फत अधिकाधिक तरुणांना विविध अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षित करुन त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येतील, असे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज येथे जाहीर केले.

५. महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ अंतर्गत २ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री.

मुंबई : महाराष्ट्र शासनाने या अधिसूचनेद्वारे शासनाच्या ०३ वर्षे मुदतीच्या एकूण २ हजार कोटी रूपयांचे  रोखे विक्रीस काढले आहे. राज्य शासनास १ हजार कोटीरुपये पर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शतीच्या अधीन राहील.

६. प्रतिबंधित क्षेत्रात संचारबंदीचे कठोरतेने पालन करा – पालकमंत्री के.सी.पाडवी.

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात संचारबंदीची अंमलबजावणी कठोरतेने करावी आणि नागरिकांमध्ये या आजाराबाबत अधिक जनजागृती घडवून आणावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.

७. तंबाखू मुक्त परिसर करण्यासाठी दंडात्मक कारवाई करा – निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे 

कोल्हापूर : शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यासोबतच आपला परिसर तंबाखू मुक्त करण्यासाठी स्वयंशिस्तीने प्रतिबंध करावा. त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकने व धुम्रपान करुन उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिले.

८. रायगड जिल्ह्यासाठी जिल्हा रुग्णालयात करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा अखेर मंजूर.

अलिबाग, जि.रायगड :  करोना रूग्ण स्वॅब तपासणी संदर्भात रायगड जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी असून आता  रायगडकरांना स्वॅब तपासणी अहवालाकरिता प्रतिक्षेची गरज भासणार नाही. अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयातच आता करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज शासनाने निर्गमित केला आहे. ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्ह्यातील विविध सार्वजनिक व खाजगी उपक्रम यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

९. वंदेभारत अभियानांतर्गत २२४ विमानांनी ३३ हजार ९७७ प्रवासी नागरिक मुंबईत दाखल.

मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत २२४ विमानांनी ३३ हजार ९७७ प्रवासी आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११ हजार ८८१, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ११ हजार ६२३ आहे. तर इतर राज्यांचे १० हजार ४७३ प्रवासीही मुंबईत दाखल झाले आहेत. १५ जुलै २०२० पर्यंत आणखी ४५ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.

१०. पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबियांना १० लाख.

मुंबई : राज्यातील पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा त्याची सेवा १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास मदत व्हावी यासाठी त्यांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

संकलन – नवनाथ मोरे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय