पुणे : पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी अलीकडेच केला. तसेच मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी महापालिकेतील दुसऱ्या एका सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नायक यांच्याशी आक्रमकतेने बोलत असल्याचा व्हिडिओ स्वतःच समाजमाध्यमावर फिरवला आहे. या व्हिडिओवर ज्या अनेक टिपण्या आल्या आहेत, त्यात काही शिवराळ, असभ्य भाषा वापरणाऱ्या तर आहेतच, परंतु काम करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीतला अत्यंत कोता, व महिलांना हीन लेखणारा दृष्टीकोण त्यातून व्यक्त होतो आहे. असे काही इतर प्रकार देखील घडल्याची ऐकीव माहिती आहे. या घटनांचा महिलांसाठी कामाचे ठिकाण सुरक्षितच हवे, अशी मागणीही स्त्री मुक्ती आंदोलनाच्या वतीने महापौर, उपमहापौर आणि महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्याकडे करण्यात आली आहे.
सध्या कोविड १९ साथीच्या काळात महापालिकेची आरोग्य यंत्रणा तुटपुंज्या संसाधनांनिशी आधीच प्रचंड दबावाखाली काम करत आहे. अशा वेळी कर्मचारी वर्गाशी नगरसेवकांनी आक्रमकपणे वागणे, दहशत निर्माण करणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. कोविडच्या पहिल्या लाटेनंतर पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विशेषतः सत्ताधारी नगरसेवकांनी नेमके काय केले याचेही उत्तर, अधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्या नगरसेवकांनी नागरिकांना द्यायला हवे. या कठीण काळी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाबरोबर एकत्रितपणे आणि एकोप्याने प्रयत्न करण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी राजकीय श्रेय घेण्याची यातून संधी शोधत आहेत. हा किळसवाणा प्रकार त्वरित थांबला पाहिजे, असेही म्हटले आहे.
सर्वच कर्मचाऱ्यांसाठी कामाची जागा ही सुरक्षितच असायला हवी. पुरुषप्रधान समाजात महिलांना काम करीत असताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते, आणि त्या महिला आहेत म्हणून लक्ष्य बनतात, त्याबद्दल संवेदनशील असण्याची आवश्यकता आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा आपल्या देशात २०१३ साली अंमलात आला. महिला अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाणे म्हणजे काम करताना धाकदपटशा दाखवणे, दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. त्यांच्याबद्दल लैंगिक छटा असलेले अपशब्द वापरणे, इत्यादी प्रकारांची दखल या कायद्याने घेतली आहे. महिलांवर अरेरावीचे चित्रीकरण करून ते प्रसारित करणे हा त्यांची बदनामी आणि मानसिक खच्चीकरण करणे आहे, याची प्रशासनाने नोंद घेतली पाहिजे. तसेच या कायद्याची अंमलबजावणी करणे याची संपूर्ण जबाबदारी ही नियोक्तावर टाकली आहे, हे विसरता कामा नये, अशीही टिपणी करण्यात आली आहे.
त्यामुळे या विशिष्ट प्रकरणांची महापालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन योग्य चौकशी करून संबंधितांना समज देऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर कोणत्याही महिला कर्मचारी, अधिकारी यांच्या संदर्भात भविष्यात असे प्रसंग घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात याव्यात, ज्या करणे कायद्यानुसार अनिवार्य आहे. मा. महापौर आणि उपमहापौर (ज्या स्वतः महिला आहेत) सर्व नगरसेवक यांची तातडीने बैठक आयोजित करून असे प्रकार परत घडणार नाहीत याची दक्षता घेतील, आणि राजकीय पक्षांचे प्रमुख आपल्या सदस्यांना महिला अधिकारी तसेच महिला कर्मचाऱ्यांशी सभ्यतेचे वागण्याबाबत सूचना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांनी असे प्रसंग घडल्यास निर्भीड पणे तक्रार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, नारी समता मंचच्या प्रीती करमरकर, भारतीय महिला फेडरेशनच्या लता भिसे, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय च्या रमा सरोदे, अड. अर्चना मोरे, डॉ. जया सागडे, सुनीती सुलभा रघुनाथ, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या पौर्णिमा चिकरमाने, सुरेखा गाडे, लोकशाही उत्सव समितीच्या अलका पावनगडकर, अंजली मुळ्ये, मिळून साऱ्याजणी गीताली विनायक मंदाकिनी स्त्री मुक्ती संघटना डॉ. करूणा गोखले, मुक्ता शिंगटे, समाजवादी महिला सभाच्या वर्षा गुप्ते, तसेच अरूणा बुरटे, असुंता पारधे, अर्चना झेंडे, गिरिजा गोडबोले, क्रांती अग्निहोत्री डबीर, मनिषा गुप्ते, निर्मला भाकरे, नागमणी राव, निर्मला साठे, प्रसन्ना इनवली, रझिया पटेल, डॉ. रश्मी बोरीकर, श्रुती तांबे, शैलजा अरळकर, शारदा वाडेकर, साधना नातू, साधना खटी, साधना दधिच, संध्या फडके, संगीता गंधे, संयोगिता ढमढेरे, सुलभा पाटोळे, सुनिता बंडेवार, सुषमा देशपांडे, तेजस्वी सेवेकरी, उज्वला मसदेकर, वैशाली भांडवलकर, वंदना कुलकर्णी, विद्या कुलकर्णी, वंदना पलसाने, विनिता बाळ आदींंची नावे आहेत.