Friday, November 22, 2024
Homeजिल्हाकेंद्र सरकार बदलण्याची ताकद कामगारांत - भटेवरा

केंद्र सरकार बदलण्याची ताकद कामगारांत – भटेवरा

कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी विचारमंच पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

नाशिक
: आज देशाच्या प्रश्नांवर खासदारांत अनावस्था आहे. तीन वर्षात सत्तर टक्के अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर झालेत. अर्थसंकल्पाच्या प्रती अवघे पंधरा मिनिटे अगोदर खासदारांना दिल्या जातात. इंधन, महागाई यावर चर्चा होत नाहीत. पत्रकारांना
संसदेमध्ये प्रवेश करण्यास मज्जा आहे. हे गत सत्तर वर्षात प्रथमच घडले आहे. आठ वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे संवाद संपला आहे. हे लोकशाहीला घातक आहे. कामगारांमध्ये सरकार बदलण्याची ताकद आहे. कामगारांच्या एका चिंगारीने भडका होऊ शकेल अशी आजची स्थिती आहे असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी केले.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कस फेडरेशन पुरस्कृत कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंचच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. जागतिक कामगार परिषद फ्रान्सचे सचिव व वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे कृष्णा भोयर, माधव जोगळेकर, राजू देसले, बाबालाल नाईकवाडी, बी.एल. वानखेडे, अरुण म्हस्के, लिलेश्वर बनसोड, नाना पाटील, भारती भोयर, व्ही.डी. धनवटे, बी.एन. कुलकर्णी, पी.एम. कुलकर्णी, जे.एन. पाटील, प्रमोद देशमुख, जी.आर. पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते. भटेवरा यांनी दिल्लीतील लोकसभेच्या कामकाजावर प्रकाश टाकून आज मीडिया लाचार झाल्याची खंतही व्यक्त केली.

यावेळी कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल तुकाराम पा. बोराडे यांना ५१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मानपत्र देऊन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्कारातील पंचवीस हजार रुपये त्यांनी त्र्यंबक रोडवरील आधार तीर्थ आश्रमास दिले.

ठाण्याच्या क्रांती प्रभाकर जेजुरकर यांना ३१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तो पुरस्कार त्यांच्या स्नुषा सयुरी जेजुरकर यांनी स्वीकारला तर त्यांच्या सहयोगी वर्षा बोरकर यांनी क्रांती जेजुरकरांच्या भावना वाचून दाखविल्यात. या पुरस्कारातील रक्कम त्यांनी भारतीय महिला फेडरेशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबई समिती, मुंबई विद्यापीठ निवृत्त प्राध्यापक संघटना या तीन संघटनांना प्रत्येकी अकरा हजार रुपये देण्याचे यावेळी घोषित केले.

तिसरा कृतज्ञता पुरस्कार वीज कामगार चळवळीत अमूल्य योगदान देणारे दिवंगत झुंजार नेते आर.सी. चौधरी यांना एकवीस हजार रुपये शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व मानपत्र देण्यात आले. ते त्यांच्या पत्नी श्रीमती द्वारकाबाई आणि पुत्र दत्ता चौधरी व मुलींनी स्वीकारला. यावेळी सत्कारार्थी तुकाराम बोराडे, सुवर्णा चौधरी तसेच राजू देसले, माधव जोगळेकर, कृष्णा भोयर यांचीही भाषणे झाली.

भाकप नेते आयटक राज्य सचिव राजू देसले यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांचा देश असणाऱ्या देशात13 दिवसात 89 शेतकरी आत्महत्या करतात याचा विचार केला पाहिजे. वाढती महागाई मुळे सर्वसामान्य जनतेला जगणे कठीण होत आहे. देशातील शेतकरी आंदोलन दिल्लीत जिंकले त्याला कामगार संघटना नि सक्रिय पाठिंबा दिला होता. आज तसेच या पुढील काळात शेतकरी व कामगार एकजूट च केंद्र सरकार ला जाब विचारू शकते ती बळकट करण्याचे आवाहन केले.

केंद्र सरकार सत्तेत येण्यापूर्वी दिलेले आश्वासन पाळत नाही. कामगार ना मिळणारी तुटपुंजी इपीएस 95 ची पेन्शन किमान 1 हजार रुपये च मिळत आहे ती 9 हजार रुपये महागाई भत्ता सह देण्यासाठी आपण लढाई करत आहोत. मात्र 2013 मध्ये भाजप ने सत्तेत आल्यास 3 हजार रुपये पेन्शन महागाई भत्ता सह भगतसिंग कोशियारी अहवाल लागू करू याची अंमलबजावणी केली नाही. 25 ऑगस्ट 2022 रोजी भाजपच्या केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानी नाशिक येथे भव्य जबाब दो मोर्चा पेन्शनर्स काढणार आहेत. त्यात वीज कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मोहन शर्मा यांनी वीज संशोधन कायदा बील चार वेळा केंद्र सरकारने संघटनांशी चर्चा न करता संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कामगार संघटनांच्या तीव्र विरोधाने तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आता पुन्हा ते बील आणण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा कामगारांनी संघर्षासाठी सज्ज रहावे असे आवाहन शर्मा यांनी करून मोदी सरकारने सोळा सार्वजनिक उद्योगांची विक्री केल्याची सविस्तर माहिती दिली. त्यात कोळसा खाणी, नैसर्गिक गॅस, रेल्वे स्टेशन, विमानतळ, बंदरे, रेल्वे, रेल्वे स्टेशन, रेल्वे गुडसशेड, स्टेडियम, शीतगृहे आदींचा समावेश आहे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी व्ही.डी. धनवटे यांनी प्रास्तविक केले. जयंत ठोंबरे पंडित कुमावत यांनी सूत्रसंचालन तर एस.आर. खतीब यांनी आभार प्रदर्शन केले. कॉ. दत्ता देशमुख, ए.बी. बर्धन, जी.आर. तांबोळी व आर.सी. चौधरी यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी नाट्य रूपात मांडलेल्या वेदना आणि दोन अनाथ मुलांनी आई वडिलांच्या आत्महत्येनंतर त्यांच्यावर ओढावलेले प्रसंग, सहन कराव्या लागणाऱ्या यातना व वेदना मांडल्याने सभागृह भारावून गेले होते. या कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन अरूण म्हस्के, पंडित कुमावत, नारायण देवकाते, आप्पा कुलकर्णी, रोहिदास पवार, सुरेश चौधरी, वंदना चव्हाण, दिलीप मोरे, प्राची पाटील, पुनम आहेर, दिपक गांगुर्डे, विक्रांत आहेर, गणेश सुर्यवंशी, मुकेश पवळे, अमोल जगळे, सदाशिव भागवत, बाजीराव सगभोर, भास्कर लांडगे, सुनिल मालुंजकर, अनिल ठवकर, नामदेव बोराडे, रामचंद्र टिळे, महादेव खुडे, अनिल बोराडे, महेश कदम, गीतेश वाघेरे आदींनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय