Friday, May 3, 2024
Homeविशेष लेखस्रियांवरील अत्याचार थांबतील का ?

स्रियांवरील अत्याचार थांबतील का ?

 स्रियांवरील अत्याचार थांबतील का ?

केंव्हा बदलेलं पुरुष जातीची ही विकृत मानसिकता ? काही दिवसांत मनाला सुन्न करून टाकण्याऱ्या एकापाठोपाठ ३ घटना घडल्या.या काही दिवसांत घडल्या असे काही नाही,इतिहास जमा कित्येक स्त्री अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत आणि आजही घडत आहेत. मात्र यांस जबाबदार कोण? हा प्रश्नच आहे. पहिली घटना जुन्नर तालुक्यातील तांबे येथील, येथे एका आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर ३ युवकांनी बलात्कार केला, तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत कुणाला सांगू नये म्हणून या नराधमांनी तिचे नग्न फोटो काढले आणि तिला कुणाला सांगू नको अशी धमकी दिली.दुसरी घटना रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील वडगाव येथील आहे. इथेही आदिवासी कातकरी जमातील एका अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तिसरी घटना लातूर  जिल्यातील अहमदपूर येथील आहे. येथे एका ६० वर्षीय वृध्द महिलेवर बलात्कार करण्यात आला.आपल सर्वस्व लुटलं गेल या धक्क्याने महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केली. तसं पाहिल गेल तर हा सुद्धा एक खूनच होता.

आज देशात ,राज्यात असे कित्येक गुन्हे घडत आहेत.कित्येक स्रियांवर अत्याचार होत आहेत.काही घटना समोर येतात तर काही येतच नाही. आणि विशेष म्हणजे त्यांची नोंद हि होत नाही.अश्या स्त्री अत्याचाराच्या  कितीतरी घटना आहेत.आज राज्यात, देशात बलात्काराच्या प्रमाणात अधिक वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस ही वाढ होतंच आहे. मात्र यावर ना सरकार बोलू पाहताय ना समाजव्यवस्था बोलू पाहतेय.भारत देशात दर १७ मिनिटांनी आणि दिवसाला सरासरी ८७ बलात्काराच्या घटना घडत आहेत.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या ( National Crime Record Bureau ) च्या नोंदणीनुसार २०१९ या वर्षात बलात्काराच्या एकूण ३२,०३३ घटना आणि बलात्कारानंतर हत्येच्या ८९ घटना समोर आल्या आहेत.समोर आल्या नाहीत त्याची वेगळीच मोजणी होईल.  बलात्काराच्या आणि खुनाच्या सर्वाधिक घटना या महाराष्ट्र राज्यात घडल्या आहेत. २०१९ मध्ये राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार दिवसेंदिवस या बलात्काराच्या  घटनांच्या आकडेवारी मध्ये फार मोठी वाढ झालेली आहे. हे प्रमाण का वाढत आहे ? याचा खर तर विचार करण्याची गरज आणि त्यावर योग्य कृतिकार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.

समाजात दिवसेंदिवस बलात्कार,विनयभंग,लैंगिक अत्याचार या सारख्या घटनांमध्ये वाढ होत चालेली आहे.याची कारणे वेगवेगळी जरी असली तरी एक मूळ कारण मात्र याचे लक्षात घेणे गरजेचे आहे. याच मुख्य कारण म्हणजे देशातील पितृसत्ताक संस्कृतीमुळे स्त्री कडे माणूस म्हणून न बघता स्त्री एक वस्तू किवा सेवा पुरवणारी व्यवस्था आहे.या दृष्टीकोनातून पाहिले जाते.समाजात स्त्री –पुरुष विषमता,स्त्रीला दिले गेलेले दुय्यम स्थान यामुळे पुरुष प्रधान असलेल्या समाजात स्त्रीला  नेहमीच पुरुषी वर्चस्वाला सामोरे जावे लागत आहे. जो पर्यंत स्त्री कडे ‘ती ही एक माणूस आहे ! असे बघण्याची पर्यंत समाजाची मानसिकता होत नाही तो पर्यंत हे असे  अनेक अत्याचार घडत राहतील यात शंकाच नाही.स्त्री- पुरुष गुणोत्तर प्रमाण हे देखील विषम असलेलं पहावयास मिळत आहे.हेही एक कारण आज  स्रियांवरील वाढत्या अत्याचारांच्या बाबतीतील समोर येत आहे.अत्याचार,विनयभंग,बलात्कार करून तिचा खून करणे हि एक  विकृती आहे.

या व अश्या अत्याचारांना वेळीच पायबंद घालण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे.समाजात बलात्कार या सारख्या घटना घडू नयेत, म्हणून समाजातील वातावरण ,समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्त्रीकडे ती स्त्री आहे, ती उपभोगाची वस्तू आहे या दृष्टीकोनातून न पाहता, ती एक माणूस आहे या नजरेतून (मानसिकतेतून) पाहणे आवश्यक आहे.समाजातील स्त्री – पुरुष विषमता नष्ट झाली पाहिजे.मुलामुलींना योग्य वयात लैंगिक शिक्षण दिले गेले पाहिजे.स्त्री ही आपल्या मालकी हक्काची आहे,तिच्यावर आपण कधीही मानसिक आणि शारीरिक वर्चस्व गाजवू शकतो.अशी विकृती भावना,मानसिकता बदलणे गरजेचे आहे.बलात्कार ,विनयभंग,अत्याचार, लैंगिक शोषण असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारास कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.झालेल्या घटनेचा तपास आणि दोषींवर कारवाई करणे ही जी काही प्रक्रिया असते ती वेळेवर झाली पाहिजे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनेचा जलदगतीने तपास लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. स्रियांनीही स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे.

बलात्काराच्या घटना जेव्हा समाजात घडतात तेव्हा मीडिया,वर्तमानपत्र हे बलात्कार पीडीतेच्या जातीचा उल्लेख करतात तो करणे खरच आवश्यक आहे का ? आपण माणूस म्हणून या घटनांकडे पाहू शकत नाही का? जेव्हा एखाद्या मध्यमवर्गीय व उच्चवर्णीय अल्पवयीन मुलीवर,वृध्द महिलेवर  बलात्कार,हत्या होते तेव्हा सारा देश पेटून उठतो. मेणबत्ती मोर्चे काढले जातात.मग आदिवासी,दलित,मागास वर्गातील मुलींवर,स्त्रियांवर बलात्कार,करून हत्या केली जाते तेव्हा हा समाज का?पेटून उठत नाही.ती मुलगी ,स्त्री ही  दलित ,आदिवासी समाजातील आहे म्हणून का?बलात्कार,अत्याचार, लैंगिक शोषण या सारखे गुन्हे घडतात तेव्हा जात,धर्म पाहणे खरच महत्वाचे वाटते का ? पूर्वीपासून  दलित, आदिवासी,मागासवर्गीय या समाजाचे शोषण होत आहे.आता कुठे थोड्या फार प्रमाणात हे घडणारे गुन्हे समाजासमोर येत आहेत.असे किती तरी अन्याय ,अत्याचार समोर येतच नाहीत.खरतर अश्या घटना घडल्यानंतर पीडितेला योग्य न्याय मिळायला हवा मात्र असे होताना दिसतंच नाही.बलात्कार,अत्याचार, लैंगिक शोषण या सारखे गुन्हे घडतात तेव्हा जात,धर्म दाखवून यावर हि जातिवरून,धर्मावरून,राजकारण केले जाते. जर अश्या घटना/गुन्हे  घडल्यानंतर पीडित व्यक्ती कोणत्या जाती,धर्माची आहे या मानसिकतेतून आपण  पाहत असाल तर खरच विचार करणे गरजेचे आहे कि खरंच देशातील जात,धर्म भेद नष्ट झाला आहे का? म्हणून या घटनांकडे माणूस म्हणून पाहणे आवश्यक आहे.

बलात्कार,विनयभंग,लैंगिक शोषण,बलात्कार करून क्रूरपणे हत्या या सारख्या गुन्ह्यांविषयी कठोर कायदे  करावेत.आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा तरदूत करावी.शिक्षा करून हे थांबेल असे नाही मात्र त्यास थोड्याफार प्रमाणात आळा बसेल.कारण गुन्हेगारास कायद्याची भीतीच राहलीच नाही.पेण मध्ये घडलेल्या घटनेतील  हा आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. तो आरोपी या पूर्वीही बलात्कारच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत होता.अलीकडेच तो जामिनावर सुटून बाहेर आलेला आहे.हा आरोपी जर बलात्कारच्या गुन्हा करून तुरुंगात गेला असेल तर याला जामीन मिळाला कसा ? हा प्रश्न उपस्थित होतो.बलात्कार करणाऱ्या कोणत्याही जाती धर्माचा,पक्षाचा म्हणून त्याला पाठीशी घालण्यात येऊ नये,कारण अश्या नराधमांना कोणताही धर्म नसतो, पक्ष नसतो, जात नसते ,ती असते फक्त  विकृती आणि गुन्हेगारी. या सर्वांना पायबंद घालण्यासाठी समाजातील पुरुषप्रधान संस्कृती,वासनाधीन मानसिकता बदलणे आवश्यक आहे.त्या सोबतच पीडित व्यक्तीला व तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न शासनदरबारी व्हावा.

– स्नेहल साबळे 

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी करत आहेत.)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय