Friday, December 6, 2024
Homeग्रामीणपिंपरी चिंचवड : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना मिळणार घर, साडेतीन हजार घरांची...

पिंपरी चिंचवड : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना मिळणार घर, साडेतीन हजार घरांची सोडत

पिंपरी चिंचवड : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेल्या च-होली, रावेत, बो-हाडेवाडीतील साडेतीन हजार घरांची सोडत चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (दि.11) दुपारी तीन वाजता काढण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते तर महापाैर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. याप्रसंगी महापाैर माई ढोरे, उपमहापाैर केशव घोळवे, स्थायी सभापती संतोष लोंढे उपस्थित होते.

या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, डाॅ. अमोल कोल्हे तर आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, आण्णा बनसोडे, संग्राम थोपटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातून पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी एकूण 47 हजार 878 इतके अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे च-होली एक हजार 442, रावेत 934, बो-हाडेवाडी एक हजार 288 अशा एकूण 3 हजार 664 घरांसाठी सोडत काढण्यात येईल. या सोडतीनंतर सदनिकेची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पात सदनिका धारकांना पहिल्यांदा 10 टक्के स्वः हिस्सा भरावा लागणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतरांना आरक्षण ठेवले आहे.

कोरोना महामारीमुळे शासनाचे सर्व नियमांनूसार घरांच्या सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कार्यक्रम स्थळी गर्दी करु नये, त्यासाठी महापालिकेने सोडतीचा पुर्ण कार्यक्रम महापालिका फेसबुक पेजवर, युट्यूब द्वारे लाईव्ह दाखविण्यात येईल.

लाभार्थ्यांना दीड वर्षात मिळेल घर…

पंतप्रधान आवास योजनेतील रावेत, बो-हाडेवाडी, च-होली प्रकल्पात सोडतीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना दीड वर्षात घरे देण्यात येतील. सध्यस्थितीत रावेत 10 टक्के, बो-हाडेवाडी 25 टक्के, च-होली 15 टक्के प्रकल्पांचे काम झालेले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय