कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमताने एकूण १३६ जागा जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. आज (रविवार) संध्याकाळी बेंगळुरू येथील हॉटेल शांग्रीला येथे नवनिर्वाचित काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.
या ऐतिहासिक कामगिरीचे हिरो असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. तो तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसने पक्षनिरीक्षक म्हणून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.
काँग्रेसने मुख्यमंत्री नेमण्यासाठी एक समिती तयार केली आहे. यामध्ये जेष्ठ काँग्रेसनेते सुशिल कुमार शिंदे यांचा सहभाग आहे. शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंग यांची काँग्रेसने निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. आज काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निरीक्षक उपस्थित राहणार असून, ते पक्षाच्या हायकमांडला अहवाल सादर करतील.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबाबत गांधी कुटुंबीयांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे, त्यामुळे गांधी कुटुंबीयांबरोबरच बंगळूरूमध्ये काय घडतंय, याकडे संपूर्ण कर्नाटकाचे लक्ष लागले आहे.

