Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकाय आहे वेदोक्त प्रकरण ? संयोगीताराजेच नाही तर खुद्द छत्रपती शाहू महाराजांना...

काय आहे वेदोक्त प्रकरण ? संयोगीताराजेच नाही तर खुद्द छत्रपती शाहू महाराजांना झालेला विरोध

नाशिक : छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भेट दिली. या दरम्यान त्यांना महंतांनी मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास मनाई केली.यासंदर्भात संयोगिताराजे यांनी पोस्ट करत सोशल मीडियावर सांगितले. त्यानंतर सगळीकडे चर्चेला उधाण आले.

तुम्हाला माहिती आहे का फक्त संयोगिताराजेच नाही तर या आधीही शाहू महाराजांसोबतही असंच झालं होतं. त्यांना सुद्धा वेदोक्त मंत्र म्हणण्यास मनाई केली होती. काय आहे प्रकरण? आणि वेदोक्त मंत्राचं महत्त्व काय? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

वेदोक्त मंत्र व पुराणोक्त मंत्र काय प्रकार आहे?

आर्यांमध्ये पुन्हा तीन वर्ग होतात ते प्रतिष्ठेच्या क्रमाने ब्राम्हण क्षत्रिय व वैश्य.हे तिनही वर्ग वेदोक्त कर्मासाठी पात्र आहेत असे अनादीकालापासून समजले जाते. शुद्र वर्णियांना वेद पठणाचा अथवा वेदोक्त मंत्रांनी संस्कार करण्याचे अधिकार नाहीत म्हणजेच ते अनार्य अथवा आर्येतर आहेत.

वेदविद्यालयातील संथा घेऊन शिकणारे आणि वेदाला अनुसरणारे वेदोक्त पुजा करु शकतात. पुराणोक्त संस्कृतचपण म्हणायला सोपी व सहज अशी रचना पुराणातून वर्णन केलेली म्हणून पूराणोक्त.

अनेक महतांच्या मते, वेदोक्त मंत्रावर सर्व सामान्यांचा हक्क नाही. क्षत्रीय, ब्राम्हण आणि वैश्य लोकांचाच या मंत्रावर हक्क आहे. त्यामुळे महंत क्षत्रीय, ब्राम्हण आणि वैश्य लोकांना सोडून इतर लोकांना वेदोक्त म्हणण्यास नकार देतात. याविरोधात शाहू महाराजांनीही त्यांच्या काळात आवाज उचलला होता. हे प्रकरण काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

छत्रपती शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण

१८९९ चा काळ. पंचगंगेवर शाहू महाराज नेमाने स्नान करण्यास जायचे. असेच एके दिवशी स्नानाच्या वेळेस मंत्र म्हणणाऱ्या नारायण भटाच्या तोंडून जे मंत्र बाहेर पडत होते ते पुराणोक्त होते, ही गोष्ट राजारामशात्री भागवत यांनी महाराजांच्या नजरेस आणून आणली. विशेष म्हणजे नारायण भट स्वत: आंघोळ करुन आले नव्हते पण पुराणोक्त मंत्र उच्चारत होते.

जेव्हा शाहू महाराजांना हे कळले तेव्हा त्यांनी नारायण भटास वेदोक्त मंत्र म्हणण्यास सांगितले. नारायण भटाने मात्र “महाराज शुद्र आहेत” असे स्पष्ट सांगत मंत्र म्हणण्यास नकार दिला. नारायण भट पुढे म्हणाले, “धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ असतात आणि सर्व शक्तिमान ब्राह्मण समाज तुम्ही क्षत्रिय आहात हे जाहीर करेपर्यंत तुम्ही आमच्यासाठी शुद्रच आहात” आणि येथुनच वेदोक्त वादास सुरवात झाली.

त्यानंतर यावर महाराजांनी आवाज उचलवत “राजकारणात केल्या जाणाऱ्या दैनंदिन व नैमित्तिक स्वरूपाच्या सर्व धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता त्या फक्त वैदिक विधी नुसारच करण्यात याव्यात”असा आदेश काढला. या आदेशावर टिका विरोधही करण्यात आला पण महाराज थांबले नाही.

आता पुन्हा संयोगीताराजेसोबतही तेच घडले. त्यामुळे वेदोक्त प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहेत. संयोगीता राजे यांनी पोस्टमध्ये लिहिले, “या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही?अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे.अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे. हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!”

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय