घोडेगाव (आंबेगाव): आमची ग्रामपंचायत कोणती ? स्थानिक आदिवासी कातकरी समुदायाने प्रशासनाला सवाल केला. या प्रश्नी अखिल भारतीय किसान सभेने ग्रामविकास विभाग व विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. लवकरच तोडगा काढला नाही, तर 26 जानेवारी पासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.
डिंभे धरणाचे बुडीत क्षेत्र मधील संपादन होवून शिल्लक राहिलेले आंबेगावचे भौगोलिक क्षेत्र, ग्रामपंचायत बोरघर, ता.आंबेगाव, जिल्हा पुणे मध्ये समाविष्ट करणेबाबत, ग्रामस्थ, शाश्वत संस्था व किसान सभा अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार बुडीत आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र सुमारे १० हेक्टरच्या आसपास आहे. व २६ निवासी घरे आहेत. याठिकाणी मुख्यत: आदिम जमाती कातकरी या समाजाचे वास्तव्य आहे.
तसेच येथील उर्वरित क्षेत्र कोणत्याच ग्रामपंचायतीला न जोडल्यामुळे आदिम जमाती कातकरी यांना आदिवासी विकास विभागाकडून मिळालेली घरकुले यांची नोंदही होऊ शकली नाही तसेच कोणत्याही नागरी सुविधा त्यांना प्राप्त झालेल्या नाहीत. या अनुषंगाने ग्रामस्थ, शाश्वत संस्था व किसान सभा यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे.
याचा परिणाम म्हणून पंचायत समिती, आंबेगाव यांनी परिपूर्ण प्रस्ताव, पुणे जिल्हा परिषद यांना पाठवला व पुणे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मान्य करून व आवश्यक त्या ठरावासह तो विभागीय आयुक्त,पुणे यांना दि.२७ नोव्हेंबर २०१७ रोजी सादर केला. व विभागीय आयुक्त कार्यालयाने दि.२० डिसेंबर २०१७ रोजी सदरील प्रस्ताव मान्यतेसाठी सचिव, ग्रामविकास विभाग (मंत्रालय) यांना पाठवला होता. मात्र यावर अद्याप केली कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
हा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे व बुडीत आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र ग्रामपंचायत बोरघर ला जोडण्यात यावे अशी मागणी किसान सभेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजू घोडे व सचिव अशोक पेकारी यांनी ग्रामविकास विभगाचे सचिव व विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
हा प्रश्न २६ जानेवारी २०२१ पर्यंत न सुटल्यास २६ जानेवारी २०२१ पासून राहत्या ठिकाणीच स्थानिक ग्रामस्थ व किसान सभेचे कार्यकर्ते बेमुदत उपोषण करणार आहेत. यामध्ये संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ असे एकूण १० व्यक्ती हे बेमुदत उपोषण करतील. हा प्रश्न सुटण्यासाठी ग्रामस्थ, किसान सभा, व सामाजिक कार्यकर्ते बुधाजी डामसे, सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत.