डहाणू : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढलेल्या वनक्षेत्रातील आवासा च्या जमिनी संदर्भातील राजपत्राचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी स्वागत केले आहे.
यावेळी आ. निकोले म्हणाले की, आदिवासी समाज हा जंगलाच्या सान्निध्यात वाढत असल्यामुळे जंगल संवर्धन व पर्यावरण रक्षण हा त्याच्या संस्कृतीचा भाग आहे. आदिवासींची संस्कृती ही पर्यावरण पूरक आहे त्यामुळे स्थानिक आदिवासीकडून पर्यावरणास व त्यासंबंधी लोकसहभागातून करायच्या उपाययोजनांना कधीही धोका उत्पन्न होऊ शकत नाही. आदिवासींच्या जंगलावरील हक्कांना मान्यता देण्यासाठी व त्यांच्या प्रथा परंपरा यांचे संरक्षण करण्यासाठी वनहक्क कायदा व पेसा कायदा असे दोन महत्त्वपूर्ण कायदे केंद्र शासनाने पारित केलेले आहेतच. यापैकी वनहक्क कायद्यामध्ये वनांचे व जैवविविधतेचे संरक्षण संवर्धन करण्याची जबाबदारी ही स्थानिक लोकांवर टाकली आहे. तर पेसा कायद्यान्वये आदिवासींच्या रूढी-परंपरा, स्थानिक नियोजन व कायदे याबाबत ग्रामसभांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आदिवासींच्या स्थानिक जंगलांचे जैवविविधतेचे व पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या कायद्यात पुरेशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तरी देखील वन विभाग आदिवासी समाजावर अन्याय करत असून त्यांच्या घरांवर कार्यवाही करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम आणि विधी व न्याय विभागाकडून आलेले विधेयक महाराष्ट्र शासन राजपत्र अ साधारण भाग – आठ, बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२० असाधारण क्रमांक ७५ प्राधिकृत प्रकाशन केले असून आदिवासी कुटुंबांना निवासा लगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर सदर अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात परंपरेने राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार असून त्यांचे मूळ गावातून स्थलांतर कमी होईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र शासनाने त्याची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासी समाजाला न्याय देणे अपेक्षित आहे, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगितले आहे.
तसेच वनहक्क कायद्याची अंमलबजावणी त्वरेने करून आदिवासी पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन त्यांच्या नावावर करणे अत्यावश्यक आहे, असेही आमदार विनोद निकोले यांनी सांगितले.