Sunday, May 19, 2024
Homeराज्यकिसान सभा आयोजित पाणी हक्क परिषद संपन्न

किसान सभा आयोजित पाणी हक्क परिषद संपन्न

मुरबाड : केंद्र सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेचे ग्रामपंचायत देवगावमध्ये काम चालु आहे, मागील दोन वर्षापासुन काम चालू असून अजून पर्यंत पूर्ण झाले नाही. परंतु, सद्यस्थितीत गावकऱ्यांना होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे, ते पिण्यायोग्य नाही. गावकर्‍यांना विकत पाणी आणावे लागते. तसेच, वेळेवर सोडले जात नाही असे असताना ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून पाणी पुरवठा विभागाला वारंवार निवेदन देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही म्हणून देवगाव मधील पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा करून योग्य दिशा ठरविण्यासाठी पाणी हक्क परिषद रविवार १७ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा, देवगाव ता. मुरबाड जि. ठाणे येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. 

तसेच या परिषदेत गावातील समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यानूसार मागण्यांचा ठराव पारीत करण्यात आला आणि गावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ११ सदस्यांची देवगाव युनिट समिती गठीत करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून कॉ. दिलीप कराळे व सचिव म्हणून कॉ. संतोष तुपे यांची एकमताने निवड करण्यात आली.

परिषदेचे उद्घाटन किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ. लक्ष्मण भांडे यांनी केले. परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून किसान सभा जिल्हा समिती सदस्य कॉ. जगदिश भालके व सीटू संघटना सचिव कॉ. सागर भावर्थे उपस्थित होते.

परिषदेचे अध्यक्ष म्हणून किसान सभा राज्य समिती सदस्य कॉ.डॉ.कविता वरे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करताना तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेचे तीन तेरा वाजले असून शासकीय यंत्रणेचे कंत्राटदारांवर अंकुश नसुन ते मनमानीपद्धतीने योजना राबवत आहेत. परिणामी योजनेचा मुळ उद्देश पायदळी तुडवला जात आहे. प्रशासन जागे होऊन योग्य पावले उचलणार नसेल तर संघटना त्यांना सळो कि पळो केल्या शिवाय राहणार नाही. 

कॉ. दिलीप कराळे, संतोष तुपे, मंगळ अहिरे, नंदा मार्के, विठ्ठल बोटकुंडले, रामचंद्र डोंगरे यांनी परिषदेचे संयोजन केले होते. परिषदेचे सूत्रसंचालन कॉ. संतोष तुपे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कॉ. दिलीप कराळे यांनी केले. सदर परिषदेला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय