जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळ बंद असली तरी ती फक्त कागदावर राहिली आहेत. दर शनिवार व रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत आहेत. पोलीस प्रशासन, स्थानिक वनव्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत प्रशासन यांना न जुमानता पर्यटकांची गर्दी सुरुच आहे.
गाड्याच्या गाड्या भरुन पर्यटक येत असतात. आणि मोठी गर्दीही पहायला मिळत आहे. पर्यटक परिसरात आपली वाहने लावून पायी पुढे जात आहेत. पर्यटकांना बंदी घातली असणारा फलक लावण्यात आले आहे. मात्र याचा काही एक फायदा झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पर्यटकांच्या गर्दीने आमच्या गावात कोरोनाला एक प्रकारचे निमंत्रण दिल्यासारखे झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कोरोना धोका टळलेला नाही
जुन्नर तालुक्यातील कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आकडे सातत्याने कमी – जास्त होत आहेत. पुणे, मुंबई या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, त्यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.