पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि. 19 फेब्रुवारी
आमदार सुनील शेळके स्वतः भाजप मध्ये पदाधिकारी होते ते आमदार होण्यासाठी राष्ट्रवादीत आले. त्यामुळे त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेण्याची गरज नाही.त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. असा इशारा चिंचवड मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिला आहे. मी स्वतः चिंचवड मतदार संघाच्या विकासासाठी कामे केली आहेत विविध प्रश्नांवर आंदोलने ही केली आहेत त्याच बळावर मी जनतेच्या आशीर्वादाने मी ही निवडणूक लढवत आहे चिंचवडची सुज्ञ जनता निश्चितपणे माझ्यामागे उभी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
काल पिंपळे निलख येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार सुनील शेळके यांनी कलाटे यांच्या संदर्भात वक्तव्य केले होते. कलाटे यांना आम्ही येत्या 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून तिकिटाची ऑफर दिली ती त्यांनी नाकारली मग आम्ही पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अनिल भोसले यांच्या जागी विधानपरिषद निवडणूक लढविण्याची ही ऑफर दिली. मात्र तीही ऑफर त्यांनी नाकारली कारण त्यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवायचीच होती त्यांचा बोलावता धनी दुसराच आहे योग्य वेळी आम्ही सांगू असे शेळके यांनी म्हटले होते. त्याला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे
कलाटे यांनी म्हटले आहे की, वाकड परिसरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी अनेक विकास कामे केली आहेत. त्यामधील शंभर कोटीची विकास कामे मंजुरीसाठी असताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समिती अध्यक्षा सांगून ती कामे स्थायी समितीत रोखली त्याबाबत मी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून नगर विकास विभागामार्फत ही कामे जनतेच्या विकासासाठी मार्गी लावली.अनेक विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. दि.24 मार्च 2021 रोजी मुंबई – बेंगलोर रस्त्यावर ताथवडे व पुनावळे येथे नविन सब-वे, भूमकर चौक, वाकड येथे नविन सब- वे साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मुंबई – बेंगलोर रस्त्यावर ताथवडे व पुनावळे येथे नविन सब-वे करणे, भूमकर चौक, वाकड येथे नविन सब- वे करणे व महापालिका हद्दीतील वाकड ते रावेत किवळे सर्व्हिस रस्ता विकसीत करणे कामी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरीत करणे बाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना दिल्लीत निवेदन दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील ताथवडे येथून जाणा-या मुंबई-बंगळुरु रस्त्यालगत 60 मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने 12 मीटर सर्व्हिस रस्ता प्रस्तावित करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. सांगवी ते किवळे बीआरटी मार्गावरील ताथवडे पुनावळे हद्दीपासून पुनावळे रावेत पुलापर्यंत आणि रावेत गावठाणापासून किवळे हद्दीतील मुकाई चौकापर्यंत मंजुर विकास योजनेत असलेली 30 मीटर रस्ता रुंदी 45 मीटर करण्यासाठीच्या फेरबदलास मान्यता देण्याची मागणी 9 एप्रिल 2022 रोजी राज्य सरकारकडे केली.
याबाबत तत्कालीन नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली. त्यांना मागणीचे निवेदन दिले. त्यावर शिंदे यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाच्या प्रधानसचिवांना दिले . शिवसेनेचे संपर्कप्रमुख माज़ी मंत्री सचिनभाऊ अहिर हेही त्यावेळी उपस्थित होते.
विविध विकास कामे मार्गे लावल्याने चिंचवड मतदार संघातील लोकांच्या कामासाठी मी तत्पर राहणारा लोकप्रतिनिधी आहे हे जनतेला कळून चुकले आणि मीही ते सिद्ध केले त्यामुळे चिंचवड मतदार संघाबाहेरील सुनील शेळके यांनी इथे येऊन आम्हाला अक्कल शिकवू नये असा इशारा कलाटे यांनी दिला आहे.