Wednesday, May 1, 2024
HomeNews'रेशीमबागे'तून देशभर भ्रम पसरवण्याचे काम,साहित्यिक चंद्रकांत वानखडे यांचे परखड मत; विद्रोही साहित्य...

‘रेशीमबागे’तून देशभर भ्रम पसरवण्याचे काम,साहित्यिक चंद्रकांत वानखडे यांचे परखड मत; विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन

वर्धा : सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद असण्याचे कारण नाही. घोषित नसली तरी अघोषित आणीबाणी तर निश्चितच आहे.वातावरण विषाक्त बनविले जात आहे. परस्पर अविश्वास आणि जाती-जातीत, धर्माधर्मात ‘भया’चे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. येवढे करूनही देश कसा प्रगती करतोय, हे उच्चारवात सांगितले जात असून नागपुरातल्या ‘रेशीमबागे’तून देशभर हा प्रगतीचा भ्रम पसरवला जातोय, असे परखड मत प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केले.

वर्धा येथे आयोजित १७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मंचावर संमेलनाची उद्घाटक आणि प्रसिद्ध अभिनेत्री रसिका आगाशे- अय्युब, माजी संमेलनाध्यक्ष गणेश विसपुते, निरंजन टकले, प्रतिमा परदेशी, मकरंद यशवंत, अंजूम कादरी, अर्जुन बागूल, नितेश कराळे, अशोक चोपडे उपस्थित होते.

वानखडे म्हणाले, ‘काश्मीर फाइल्स’ या मुस्लीम द्वेषावर आधारित सिनेमाचे ‘प्रमोशन’ खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी केले. अशा प्रकारच्या सिनेमाचे प्रमोशन करण्याचा ‘पायंडा’ या देशात पंतप्रधानांनी पाडला. अर्थात सरसंघचालक मोहन भागवत याबाबतीत मागे राहण्याची शक्यता कमीच. त्यांनीही या सिनेमाचं प्रमोशन केले. प्रेक्षकांना हा सिनेमा फुकटात दाखविण्याची चढाओढ भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. या सिनेमाने मुस्लीम द्वेषाचे पीक घेतले. देशात यंत्रणा विकल्या गेल्या आहेत. पंतप्रधानाच्या विरोधात एखादे न्यायालय कधी निर्णय देईल याची शक्यता वाटत नाही. तसे जर काही होण्याची शक्यता निर्माण झाली तर त्याचा न्यायमूर्ती लोया कसा केला जातो, याचे पुराव्यासह वर्णन पत्रकार निरंजन टकले यांनी केले आहे.
साहित्यिक सरकारच्या ताटाखालील मांजर..

साहित्यिकही सरकारच्या ताटाखालील मांजर होत आहेत की काय, अशी शंका यायला लागते. यवतमाळच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले होते. पण, त्यांच्या सरकारविरोधी भाषणामुळे सरकारने साहित्यिक संस्थांवर दबाव टाकून त्यांचे निमंत्रणच रद्द करवून टाकले. यासंदर्भात ताजी घटना म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे वर्धा येथे सुरू आहे त्याच्या अध्यक्षपदावरून झालेला गदारोळ. एखादा लेखक सावरकर आणि गांधी यांच्या विचारांची चिकित्सा करणारे एखादे विधान करतो आणि केवळ त्यामुळे त्या साहित्यिकाचे नाव अध्यक्षपदासाठी घेऊ नका, असा आदेश मंत्रालयातून येतो, अशा वर्तमानपत्रात बातम्या येतात. यावरून आज या प्रस्थापित साहित्य संस्थाही कशा दहशतीच्या वातावरणात काम करीत आहेत, हे लक्षात येते, याकडेही चंद्रकांत वानखडे यांनी लक्ष वेधले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय