Thursday, July 18, 2024
Homeजिल्हातुमच्या तिजोरीच्या चाव्या आयकर खात्याकडे..

तुमच्या तिजोरीच्या चाव्या आयकर खात्याकडे..


आयकर खात्याच्या AIS- या नवीन कार्यप्रणालीमुळे मुदतठेवी, शेअर्स, जागांची माहिती आयकरकडे सहज उपलब्ध

जागा-फ्लॅटचे छुपे व्यवहार होणार उघड

लेण्याद्री : केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या आयकर खात्याच्या नवीन कार्यप्रणालीमुळे करदात्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या नूतन AIS ऑप्शनमुळे आयकर खात्याच्या वेबपोर्टलवर आता वर्षभरात केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक  व्यवहाराचा लेखाजोखा दिसत आहे. यामध्ये ठेवी, मुदतठेवी, पतसंस्थेतील व्यवहार, शेअर्स उलाढाली, म्युच्युअल फंड, जागांची खरेदी-विक्री, महागड्या गाड्यांचे व्यवहार आदी सर्व उलाढाली दिसत असून या व्यवहारांवरील कर तसेच नफ्यावरील कर भरावा लागणार आहे. यामुळे पतसंस्थेतील छुप्या ठेवी उघड होणार असुन त्यावरील व्याजही करपात्र ठरणार आहे. मात्र अनेक पतसंस्थेनी आपल्या ठेवीदारांची यादी आयकर खात्याला सादर न केल्यामुळे सध्या केवळ काही पतसंस्थांची माहिती या पोर्टलवर दिसत आहे. त्यामुळे आयकर विवरण पत्र भरताना या सर्व बाबी तपासून त्यानुसारच आयकर भरावा, असे आवाहन कर सल्लागार अभिजित सोनपाटकी यांनी केले आहे. आयकर खाते गेल्या काही वर्षांपासून बँकांची खाती व इतर व्यवहारांची जोडणी आधार व पॅनकार्ड सोबत केल्यामुळे आता यापुढे सर्व व्यवहार थेट या पोर्टलवर दिसत आहेत.

दरम्यान अनेक करदाते कर चुकविण्यासाठी अनेक आर्थिक व्यवहार न दाखवताच रिटर्न अपलोड करत असतात, मात्र या पुढे ही चलाखी चालणार नाही. मुख्यतः शेअर बाजारातील ट्रेडिंग व त्यावरील प्रॉफिट आयकर रिटर्न्समध्ये दाखवले जात नसते. तसेच टेबलाखालून माया जमा करणारे अधिकारी अनेक स्थावर मालमत्ता विकत घेत असतात. मात्र याबाबतची माहिती ना आयकर खात्याला असते ना जनतेला. यापुढील काळात ही खाबूगिरी सहज उघड होणार असल्याचे चित्र आहे. अनेकजण रिटर्न दाखल करताना कर्ज घेतलेले घर राहते असल्याचे दाखवून होम लोनची वजावट मिळवितात. मात्र दोनपेक्षा जास्त प्रॉपर्टी असतील तर व्याज करपात्र नसते. ह्या माहितीचे संकलन नसल्यामुळे जे नागरिक खोटी वजावट मिळवत असतात, त्यांना यापुढे मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्व आर्थिक व्यवहारांची तसेच मालमत्तांची नोंद आयकर विभागाकडे करणे हे करदात्यांच्या हिताचे ठरणार असल्याचे मत ज्येष्ठ करसल्लागार सुनिल सोनपाटकी यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान नव्याने संकलित केलेली करदात्यांची अद्याप परिपूर्ण नसल्यामुळे तसेच अनेक नोंदी चुकीच्या झाल्यामुळे आयकर विवरण पत्र भरताना या माहितीचा उपयोग करू नये, असे आवाहन आयकर विभागाने केल्याची माहिती चार्टड अकाउंटंट नेहल शाह यांनी दिली. मात्र लवकरच ही सर्व माहिती अधिकृत होणार असून करदात्यांनी आपले रिटर्न्स पारदर्शक पध्दतीने अपलोड करावे, असे आवाहन नेहल शाह यांनी केले आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय