नाशिक : 17 वे वे कामगार साहित्य संमेलनात आयटक या केंद्रीय कामगार संघटनेस दुर्लक्षित करून मिरज-सांगली येथे होणाऱ्या कामगार साहित्य संमेलनात कोठेही सामावून न घेतल्याने आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसे निवेदनही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले असल्याचे देसले म्हणाले.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाअंतर्गत कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित कामगार साहित्य संमेलन मिरज, सांगली येथे दिनांक 24 व 25 फेब्रूवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. परंतु कामगार साहित्य संमेलनातील विविध कार्यक्रमात कोठेही ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या संघटनेला दुर्लक्षित करून या संघटनेच्या स्थानिक किंवा राज्यस्तरीय नेत्यास संमेलनातील एकाही कार्यक्रमात वक्ता म्हणून बोलावलेले नाही, असेही ते म्हणाले.
1920 साली मुंबईत स्थापना झालेली आयटक ही भारतातील व स्वातंत्र्य लढ्यात कामगारांना उतरवणारी पहिली संघटना आहे. आयटकचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते काॅम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक अग्रगण्य नेते होते. साहित्य संमेलनाच्या नियोजन स्थळास ज्या काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात आले आहे ते सांगली जिल्ह्य़ाचे सुपूत्र काॅम्रेड अण्णा भाऊ साठे हे देखील आयटक संलग्न मुंबई गिरणी कामगार युनियन चे खंदे कार्यकर्ते होते. कामगार कवी काॅम्रेड नारायण सुर्वे, शाहीर अमर शेख, शाहीर शेख जैनू चांद अशा कित्येक कामगार कलावंताचा साहित्यिक वारसा घेऊन कामगारांमधून साहित्यिक निर्माण करण्याचे मिशन चालवणारी आयटक ही केंद्रीय कामगार संघटना आहे, असे राजू देसले म्हणाले.
आजही आयटक कोल्हापूर चे शाहीर निकम, अनेक कामगार कवी हा वारसा चालवीत आहेत. याची सरकार दरबारी नोंद आहे. तरी देखील साहित्य संमेलनाच्या आयोजन कार्यक्रम पत्रिकेत आयटकला कटाक्षाने दुर्लक्षित करण्याच्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे देसले म्हणाले.