मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारलेलं आहे. आमदारांच्या या बंडखोरी विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांकडून आमदारांच्या घराबाहेर तसेच कार्यालयात तोडफोड केल्याच्या घटना समोर येत आहेत. यानंतर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या पाच दिवसापासून शिवसेनेचे बंडखोर आमदार हे गुवाहाटीमध्ये आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहेत, त्यामुळे शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांची कार्यालये देखील फोडली आहे. या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनेनंतर शिंदे गटातील जवळपास १५ आमदारांना केंद्र सरकराने “वाय प्लस” दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आज संध्याकाळपर्यंत शिंदे गटातील 15 आमदार यांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, सध्या आमदार सदा सरवणकर यांच्या दादर येथील घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले असून त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.
दरम्यान, या आमदारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिले होते, त्यानंतर सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार नवनीत राणा यांनी देखील शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या खऱ्या शिवसैनिकांच्या घरावर, कार्यालयावर हल्ले करण्याचा प्रकार महाराष्ट्रात सुरू असून या कुटुंबांना सुरक्षा पुरवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती.