Monday, May 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवाकड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार

वाकड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार

पिंपरी चिंचवड, १३ जुलै : अभिसार फाउंडेशनच्या वाकड येथील दिव्यांग विद्यालयाच्या वतीने आज गुरुपौर्णिमेनिमित्त डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या जीव रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ.रंजना नवले, जेष्ठ कबड्डी खेळाडू आणि क्रीडाशिक्षक शिवाजी कदम, महिला बचत गट चळवळीतील मार्गदर्शिका शैलजा कडुलकर, खडकी दारुगोळा कारखान्यातील निवृत्त कर्मचारी विजया वाघमारे यांचा आज कृतज्ञता सन्मान आयोजित करण्यात आला होता.

यावेळी निवृत्त क्रीडाशिक्षक शिवाजी कदम यांनी गुरू पौर्णिमेचे महत्व विषद करताना सांगितले की, आधुनिक काळात सर्वच क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे. वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरू – शिष्य परंपरेनेच झालेला आहे. आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाला असला तरीही गुरू शिष्य हे नाते वेदकाळापासून वृद्धिंगत होत गेले आहे. योग्य गुरू भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. भारतातील यशस्वी माणसांनी आपल्या आयुष्यात गुरूला मानाचे स्थान दिले आहे.

यावेळी डॉ.रंजना नवले म्हणाल्या की, गुरुपौर्णिमा असा दिवस की ज्या दिवशी सर्व शिष्य आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता  व्यक्त करतो. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये समाजाच्या हितासाठी उपेक्षित वर्गाच्या उत्कर्षासाठी वापरण्याची  आपल्या गुरूंना हमी  देतो. महर्षी व्यास आणि गौतम बुद्ध हे भारतातील आद्य गुरू आहेत.

यावेळी विकास जगताप, स्मिता पवार, शुभांगी जाधव, आशा अहीर, भाग्यश्री कापसे, कुणाल गायकवाड, योगेश आढाळे, लक्ष्मी मारणे, गोपेश कोठारे, ऋषीकेश मुसुदगे या शिक्षक कर्मचाऱ्यांचा बचत गट चळवळीतील शैलजा कडुलकर, विजया वाघमारे यांनी सत्कार केला. संचालक अभिजित तांबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. वैशाली खेडकर यांनी सुत्रसंचालन केले. कल्पना मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय