नांदेड : शिवणी ता.किनवट येथील आदिवासी महिलांना कपडे फाटेपर्यंत मारहाण करून जखमी करणाऱ्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर करावाई करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसे निवेदन दि.३०जून रोजी निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्ठमंडळाने दिले.
आंध आदिवासी असलेल्या पीडित महिलांचा मन हेलावणारा हृदयद्रावक व्हिडीओ समाज माध्यमातून वायरल झाला असून संतापाची लाट उसळली आहे. मागील वीस वर्षांपासून शिवणी येथील आदिवासीच्या ताब्यात असलेली आणि कसत असलेली जमीन कास्त करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतातून हुसकावून लावण्याचे काम वन खात्या कडून केले जात आहे. एकीकडे गायरान, नवाटी, परंमपोक आणि फ़ॉरेस्टच्या जमिनीवर अतिक्रमण असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने पट्टे करून देण्याचे कार्य महाराष्ट्रात सुरु असून नांदेड जिल्ह्यात मात्र असाह्य आदिवासी व गरीब शेतकऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून कपडे फाटे पर्यंत मारहाण करण्यात येत आहे.
या मारहाणीच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निषेध करीत आंदोलनाची हाक देण्यात आली असून सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आदिवासी महिलांना मारहाण करणाऱ्या फॉरेस्ट अधिकारी या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी माकपच्या वतीने वतीने करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रति आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आल्या आहेत. तसेच माकपचे आमदार कॉ.विनोद निकोले यानं निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर माकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ. उज्वला पडलवार, जिल्हा कमिटी सदस्य तथा नांदेड तालुका सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.