Thursday, May 9, 2024
Homeराजकारणसुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार; बारामतीमध्ये नणंद-भावजय हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा रंगणार!

सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार; बारामतीमध्ये नणंद-भावजय हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा रंगणार!

बारामतीमध्ये नणंद-भावजय अशी लढत होणार हे आता निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांनी पक्षावर दावा सांगितला. केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभाध्यक्ष यांनीही अजित पवारांचा दावा योग्य ठरवत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केले.यानंतर बारामती लोकसभा निवडणुकीत एनसीपी-शरदचंद्र पवारच्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत होण्याचे निश्चित मानले जात आहे. नात्याने नणंद – भावजय असलेल्या या दोघींच्या प्रचाराचे रथ बारामतीमध्ये फिरायला सुरुवात झाली आहे.

लोकशाहीत कोणीही लढू शकतं…


बारामतीमधील लढतीबद्दल सुप्रिया सुळे रविवारी म्हणाल्या, ‘लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढू शकतं. ही कौटुंबिक लढाई होऊ शकत नाही. मी याआधीही म्हणाले, की त्यांच्याकडे जो सर्वात ताकदवान उमेदवार असेल त्याला समोर आणावे, मी चर्चेला तयार आहे.कोणताही विषय घ्या, वेळ आणि स्थळ तुम्ही ठरवा मी चर्चेसाठी तयार आहे.’ बारामती हा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा गड मानला जातो. मात्र अजित दादांच्या बंडानंतर आता पवार विरुद्ध पवार अशी लढत प्रथमच बारामतीमध्ये यला मिळणार आहे.


अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्याचा उल्लेख न करता अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधताना म्हटले होते, की संसदेत भाषण करुन गावात विकास होत नाही. बारामतीच्या विकासासाठी मी इथं तुमच्यासोबत आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिय सुळेंसमोर कोणते मुद्दे असणार हे विचारले असता त्या म्हणाल्या की, मी लोकसभेची निवडणूक लढणार आहे. बेरोजगारी, महागाई, पेटीएम बँक घोटाळा, निवडणूक इलेक्ट्रोल बाँड घोटाळा अशा विविध भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आवाज उठवणार आहे. ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आहेत, ते सर्व भ्रष्ट आहेत. भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरण्यापूर्वीच त्यांनी भाजपचा मार्ग पकडला आहे. असा टोला त्यांनी अजित पवारांवर लगावला.

इलेक्ट्रोल बाँडमध्येही घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. सुप्रिम कोर्टाने नुकताच या संबंधीचा निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे की, इलेक्ट्रोल बाँड योजना घटनाबाह्य आहे. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीच प्रचाररथ फिरायला लागले आहेत. यावर अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार रथावर राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हासह सुनेत्रा पवार यांचे फोटो आहेत.

सुप्रिया सुळे तीनवेळा बारामतीच्या खासदार

बारामती हा शरद पवाराचा विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ राहिलेला आहे. त्यांच्यानंतर सध्या त्यांची कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. सुप्रिया सुळे 2006 मध्ये सर्वप्रथम राज्यसभेवर विजयी झाल्या होत्या. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीनवेळा त्या बारामतीच्या खासदार निवडून आल्या आहेत. आता त्यांची लढाई भावजयी सुनेत्रा पवारांशी आहे.

सुनेत्रा पवारही राजकीय कुटुंबातील

सुनेत्रा पवार या देखील राजकीय कुटुंबातील आहेत. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण आहेत. सुनेत्रा पवार या फक्त कुटुंबात रमलेल्या नाहीत. सामाजिक कामातही त्यांचा सहभाग असतो. एन्व्हार्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत. ही एक सामाजिक संस्था आहे. 2010 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यासोबतच विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या त्या ट्रस्टी आहेत. 2011 साली फ्रान्समध्ये झालेल्या वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या त्या थिंक टँक सदस्य राहिल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी ही कौटुंबिक लढाई नाही तर वैचारिक लढाई असल्याचे सांगत भावजयविरोधात लढण्याची तयारी केलेली दिसत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय